जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी अहमदनगर: मान्सूनने रविवारी सायंकाळी नगर जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. दिवसभरात १९ मि. मी. पावस...
अहमदनगर: मान्सूनने रविवारी सायंकाळी नगर जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. दिवसभरात १९ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक जामखेड तालुक्यात ५६ मि. मी. पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
विदर्भामार्गे आलेला मान्सून नगर जिल्ह्यासाठी लाभदायक ठरला आहे. रविवारी नगर जिल्ह्यात मान्सूनने प्रवेश केला. जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाला. जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, राहाता, नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यात पाऊस झाला.
सकाळपासूनच आकाशात काळे ढग दाटून आले होते. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नगरसह जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. मात्र भंडारदरा वगळता इतर ठिकाणी दिवसभर फारसा पाऊस पडला नाही. रात्री उशिराने मात्र आकाशात काळे ढग दाटून आले.
विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता. सखल भागात पाणी साचले होते. नगरसह पाथर्डी, कर्जत,जामखेड परिसरात सर्वाधिक पाऊस झाला. दुसर्या दिवशीही सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र दिवसभरात श्रीरामपूरसह कोल्हार आदी भागात भुरभुर झाली.










