बोगस भाऊसाहेबांवर कारवाई करा : सावंत अहमदनगर: जिल्ह्यातील जवळपास सर्वच तलाठी कार्यालयात व मंडलाधिकारी कार्यालयात तलाठी व मंडलाधिकार...
बोगस भाऊसाहेबांवर कारवाई करा : सावंत
अहमदनगर: जिल्ह्यातील जवळपास सर्वच तलाठी कार्यालयात व मंडलाधिकारी कार्यालयात तलाठी व मंडलाधिकार्यांचे दफ्तर लिहिण्याचे काम खासगी कर्मचारी करीत असून, कार्यालयाची व कार्यालयातील दफ्तरांच्या कपाटांच्या चाव्या व खासगी कर्मचार्यांकडे असल्याने दफ्तारांमध्ये मोठय़ा प्रमाणावर खाडाखोड होत आहे. तलाठी कार्यालयात कर्मचार्यांमार्फत गुंठेवारी, जमीन व औद्योगिक क्षेत्राच्या खरेदी - विक्रीचे व्यवहार चित्र सर्रास पहावयास मिळत असल्याने तलाठी कार्यालये एजंटांचे कार्यालये असल्यासारखी वाटतात
वाढत्या नागरीकरणामुळे व औद्योगिक क्षेत्रामुळे जमिनी-प्लॉटच्या खरेदी-विक्रीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. महसूल विभागाला सोन्याचे दिवस आल्याने कोतवालाच्या मदतीला एक ते तीन खासगी कर्मचारी तलाठय़ाने कामावर ठेवले आहेत. तलाठी मंडालधिकारी कार्यालयातील बहुतेक सर्वच कामांसाठी या खासगी कर्मचार्यांकडे सामान्य नागरिकांना जावे लागते. दाखले, उतारे देताना कोणत्याही प्रकारची पावती तर देत नाहीतच, शिवाय मनाला वाटेल ती रक्कम हे कर्मचारी मागत आहेत. काही कामांसाठी तर मोठय़ा रकमेची मागणी केली जाते. या कर्मचार्यांकडून सामान्य नागरिकांची अडवणूक केली जाते तसेच कामासाठी येणार्या नागरिकांना वेठीस धरले जाते. तरी खासगी कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय मराठा सेवा संघातर्फे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कृषीराज टकले यांचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी दिला आहे. या निवेदनावर डॉ. कृषीराज टकले, दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र सावंत, उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब औटी, शेतकरी जिल्हाध्यक्ष सुभाष गागरे, जिल्हा उपाध्यक्ष रामकिसन मडके, नगर तालुकाध्यक्ष अजय जगताप, पाथर्डी तालुकाध्यक्ष नामदेव काकडे, शेवगाव तालुका अध्यक्ष अर्जुन ढिसले, शहराध्यक्ष एकनाथ कराळे, तालुका उपाध्यक्ष राजू झरेकर आदींच्या सह्या आहेत










