सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यास निवडणूक आयोगाची सहमती नवी दिल्ली : संपूर्ण देशभरातील लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड...
सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यास निवडणूक आयोगाची सहमती
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरातील लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्याच्या कायदा मंत्रालयाच्या प्रस्तावास केंद्रीय निवडणूक आयोगाने सहमती दर्शविली आहे. त्यामुळे ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गत मार्च महिन्यात भाजपच्या बैठकीत मांडलेल्या या कल्पनेस निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्रस्तावावर सर्वपक्षीय सहमती झाली तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळेस घेण्यात आम्हाला कसलीही अडचण नसल्याचे आयोगाने मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोगाने याविषयीचे दोन पानी पत्र कायदा मंत्रालयाला पाठविल्याचे सूत्रांकडून समजते. विविध राज्यांमध्ये वेगवेगळय़ा वेळी होणार्या निवडणुकांमुळे सरकारच्या कामावर विपरीत परिणाम होत असल्याने या निवडणुका एकदाच घेण्याची कल्पना मोदींनी मांडली होती. त्यानंतर कायदा मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या ७९ व्या अहवालात यावर विचार करण्यात आला. कायदा मंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे या अहवालावर मत मागविले होते. या प्रस्तावास इतर पक्षांकडून काय प्रतिसाद मिळतो हे आता बघावे लागेल










