सभापती कार्ले यांच्यासह १२ जण निर्दोष बहुचर्चित मंदा शेंडगे मारहाण प्रकरणात साक्षीमध्ये आढळली विसंगती अहमदनगर : समितीच्या माजी सभापत...
सभापती कार्ले यांच्यासह १२ जण निर्दोष
बहुचर्चित मंदा शेंडगे मारहाण प्रकरणात साक्षीमध्ये आढळली विसंगती
अहमदनगर : समितीच्या माजी सभापती मंदा शेंडगे यांना सरकारी कामात अडथळा आणून मारहाण करून विनयभंग केला, तसेच दरोड्याच्या आरोपावरून दाखल असलेल्या खटल्यातील आज बाराजणांची निर्दोष मुक्तता झाली. जिल्हा न्यायाधीश श्रीयुत पांडे यांनी हा निकाल दिला. पंचायत समितीचे विद्यमान सभापती संदेश कार्लेंसह १२ जणांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
या खटल्याची माहिती अशी, पंचायत समितीच्या माजी सभापती मंदा शेंडगे यांना पंचायत समिती सभापती संदेश कार्ले, स्मिता आष्टेकर, भारती सेवक, आशाताई निंबाळकर, अनिल लांडगे, रावजी नांगरे, कमल जाधव, अलका पांढरे, राजेंद्र दळवी, गणेश कांबळे, दत्तु हजारे व भास्कर लांडगे यांनी १६ जून २00८ रोजी सरकारी कामात अडथळा आणून मारहाण करून विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाली होती.
तसेच दरोड्याचा प्रय▪केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी देखील गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश श्रीयुत पांडे यांच्या समोर झाली. सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींतर्फे फिर्यादी यांनी सांगितल्याप्रमाणे घटनेचे ठिकाण पंचायत समिती कार्यालय नमूद केले. फिर्यादी हिने दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात घटनेचे ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय नमूद केले आहे. तसेच आरोपींपैकी गणेश कांबळे यांनी फिर्यादी हिच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याला शह देण्यासाठी व राजकीय द्वेषातून खोटी फिर्याद दिली, असा युक्तीवाद आरोपींतर्फे करण्यात आला. फिर्यादी यांच्या साक्षीमध्ये तसेच त्यांच्या वतीने तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. अँड़ बी. एस. खांडरे, अँड़ संदीप वसंतराव डापसे यांनी आरोपींतर्फे न्यायालयात काम पाहिले. अँड़ यशवंतराव ठोंबरे यांची मदत झाली.










