चोरीस गेलेले सोने साईभक्तास परत; चोरी गेलेले सोने परत मिळू शकते यावर माझा विश्वास नव्हता परंतु, शिर्डी पोलिसांनी मला थे...

चोरीस गेलेले सोने साईभक्तास परत;
|
चोरी गेलेले सोने परत मिळू शकते यावर माझा विश्वास नव्हता परंतु, शिर्डी पोलिसांनी मला थेट हैदराबाद येथे फोन करून तुमचे सोने तुम्ही शिर्डीत येवून घेवून जा असे सांगितल्यावर माझा जसा साईबाबांवर विश्वास होता तसाच विश्वास पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांच्यावर झाला.शिर्डी : चोरी गेलेले सोने साईभक्त राजलक्ष्मी शर्मा यांना परत करताना डी.वाय.एस.पी. विवेक पाटील , पो.नि. प्रताप इंगळे , स.पो.नि. संदीप कहाळे , पो.कॉ. शहाजी आढाव आदी.शिर्डी-साकुरी/प्रतिनिधी
पोलिसांनी ठरविलेतर पोलीस काय करू शकतात याचा प्रत्यय हैद्राबाद येथील साईभक्त महिलेला शिर्डी पोलीसांच्या कामगिरीमुळे आला. साईंच्या दर्शनासाठी राजलक्ष्मी शर्मा व पती विष्णू शर्मा हे दोघे एक एप्रिल रोजी शिर्डीत आले होते. साई दर्शन घेवून पायी जात असताना हॉटेल हॉलिडे पार्क जवळ राजलक्ष्मी शर्मा यांच्या गळ्यातून ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन धूम स्टाईलने पळविण्यात आली होते. त्यांनी या घटनेची फिर्याद ६ जून रोजी दिल्यामुळे शिर्डी पोलिसांनी गुन्हा र.नं. १२५/२0१६ नुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात भा.द.वी. ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांनी पोलीस कर्मचार्यांची मदत घेवून सुरु केला. गुप्त खबर्यांनी दिलेल्या माहिती मुळे पोलिसांनी या गुन्ह्यात अविनाश कारभारी बाणेदार (वय २0 रा. शिर्डी), सतीष रमेश जगताप (वय २१ रा. निमगाव कोर्हाळे) यांना ताब्यात घेवून अटक केली असता त्यांच्या कडून १९ ग्रॅम सोन्याची तुटलेली चैन किंमत अंदाजे ४५ हजार रुपये हस्तगत केली. संबंधित सोने राजलक्ष्मी शर्मा या महिलेला गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर शिर्डीत बोलावून डी.वाय.एस.पी. विवेक पाटील, पो.नि. प्रताप इंगळे, स.पो.नि. संदीप कहाळे, पो.कॉ. शहाजी आढाव यांच्या उपस्थितीत देण्यात आले.









