विद्यार्थ्यांच्या पिळवणुकीच्या निषेधार्थ आंदोलन; अहमदनगर : न्यू आर्टर्स, कॉर्मस अँण्ड सायन्स महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून अवाजवी ...
विद्यार्थ्यांच्या पिळवणुकीच्या निषेधार्थ आंदोलन;

अहमदनगर : न्यू आर्टर्स, कॉर्मस अँण्ड सायन्स महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुक्ल वसूल करून आर्थिक पिळवणूक केली जाते, असा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या आवारात आसूड आंदोलन केले.
ग्रंथालय डिपॉझिट, पार्किंग, इंटरनेट, नियतकालिके, तसेच प्रवेश अर्जाच्या नावाखाली न्यू आर्टस महाविद्यालयात अवाजवी शुल्क आकारले जाते. त्याबदल्यात पाहिजे तशी सुविधा मिळत नाही. त्यामुळे हे शुक्ल विद्यार्थ्यांना परत करावे, तसेच एमएस्सी शाखेच्या गणित एन्ट्रान्स परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करावी, या मागणीसाठी भाजयुमोचे शहर जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे, ओंकार काळे, देव गुंड, शुभंकर निवडकर, भाऊ कांबळे, सागर शिंदे, वैभव शेळके, रोहन त्रिभुणे, गणेश अळकुटे आदी कार्यकर्त्यांनी महाविद्यालय परिसरात आसूड आंदोलन केले.
या सर्व मागण्यांचे निवेदन १५ दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले होते. परंतु त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने हे आंदोलन केले, असे साठे यांनी सांगितले.









