कोपर्डी घटनेतील पीडीत कुटुंबाचे न्यायमूर्ती कोळसेंकडून सांत्वन सध्या जिल्ह्यासह राज्यभर तीव्र पडसाद उमटत असलेल्या कर्जत तालुक्यातील क...
कोपर्डी घटनेतील पीडीत कुटुंबाचे न्यायमूर्ती कोळसेंकडून सांत्वन
सध्या जिल्ह्यासह राज्यभर तीव्र पडसाद उमटत असलेल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अत्याचार करून खुन करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाचे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे-पाटील यांनी काल सोमवारी (दि.१८) भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
यावेळी मुलीची आई व आजोबा उपस्थित होते. न्या. कोळसे यांनी यापुर्वीच मुलीच्या कुटुंबास खारीचा वाटा म्हणून दहा हजार रूपयांचे सहाय्य केले असून यावेळी मुलीच्या आईने अर्थसहाय्यापेक्षा मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली.यावेळी बोलताना कोळसे म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा मिळणे गरजेचे आहे. आपण घटनास्थळी भेट देवून कायदेशीर बाबींबाबत तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक विजय लगारे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. निषेध, मोर्चे, आंदोलन होणे अपेक्षित आहेतच मात्र कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ती बाबही गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून समाजानेच आता सतर्क व जागरूक राहणे गरजेचे आहे. दरम्यान श्री. कोळसे यांच्या भेटीवेळी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष विनायक मेटेही या कुटुंबाचे सांत्वन करावयास आले असता त्यांनी श्री. कोळसे यांची भेट घेवून या प्रकरणाच्या कायदेशीर बाबींबाबत चर्चा केली. तसेच श्री. लगारे यांच्याकडूनही माहिती घेतली.









