कर्मचार्यांच्या संपामुळे बॅँकिंग सेवा ठप्प; अहमदनगर ; राजू शेख नगर शहरातील चितळे रस्त्यावरील युको बँकेसमोर एकत्र जमून बँक कर्मचार्...
कर्मचार्यांच्या संपामुळे बॅँकिंग सेवा ठप्प;
अहमदनगर ;
राजू शेख नगर शहरातील चितळे रस्त्यावरील युको बँकेसमोर एकत्र जमून बँक कर्मचार्यांनी निदर्शने केली. बँक कर्मचार्यांनी पुकारलेल्या एक दिवशीय संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बँकिंग सेवा ठप्प झाली होती. केंद्र सरकार व भारतीय रिझर्व बँकेच्या विलिनीकरण, खासगीकरण, बँकिंग सुधारणा व कामगार कायद्यात सुधारणा घडवून आणण्याचे धोरण स्वीकारले असून, त्याला बँकिंग कर्मचार्यांनी विरोध दर्शविला आहे.
शहरातील चितळेरोडवरील युको बँकेसमोर कर्मचार्यांनी एकत्र येत निदर्शने केली. यावेळी विविध बँकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरकारचे बँकांविषयीचे धोरण जनहितविरोधी असून, अर्थव्यवस्थेला मारक आहे. जागतिक पातळीवरील अमेरिका, इंग्लंड या देशातील मोठय़ा बँका बुडीत निघाल्या आहेत. त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेला केवळ राष्ट्रीयकृत बँकाच्या अस्तित्वामुळे कोणताही धक्का पोहोचला नाही. बँकांच्या विलिनीकरणाचे धोरण म्हणजे कर्मचारी कपात व नोकरभरती बंद करण्याचा कट असून, हळूहळू त्याचे खासगीकरण करण्याचा उद्देश असल्याचे यावेळी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.
बँकातील थकीत व बुडीत कर्जाचे कारण सांगितले जात आहे. मात्र, सरकाने थकीत व बुडीत कर्जदारांना अभय न देता वसुली कायद्यात सुधारणा करून बँकांना कायदेशीर हक्क प्रदान करावेत, कर्जदारांवर फौजदारी दावे दाखल करावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी कांतीलाल वर्मा, माणिक अडाणे, वर्षा अष्टेकर, डी. पी. काळे, उल्हास देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या संपाला राज्य सरकारी संघटनेचे योगीराज खोंडे, सुभाष तळेकर, बाळासाहेब वैद्य, पी. डी. कोळप यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी उमाकांत कुळकर्णी, महादेव भोसले, अर्जुन हजारे, दत्ता जागे, शिवाजी पळसकर, राहुल भळगट, भास्कर पाटोळे, दीपक निसळ आदी उपस्थित होते.









