नगर सचिवांना कार्यालयातील अनुपस्थितीबाबत नोटीस अहमदनगर ; महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीत विरोधकांच्या टीकेचे धनी...
नगर सचिवांना कार्यालयातील अनुपस्थितीबाबत नोटीस
अहमदनगर ;

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीत विरोधकांच्या टीकेचे धनी ठरलेले नगरसचिव मिलिंद वैद्य यांचे मंगळवारी अपहरण झाल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर केला होता. नेमके वैद्य या दिवशी का गैरहजर राहिले याबाबत प्रभारी आयुक्त विलास वालगुडे यांनी नगरसचिव वैद्य यांना लेखी खुलासा मागितला असून तशी नोटीस त्यांना दिली असल्याचे समजते.
स्थायी सदस्य निवडीसाठी आयोजित विशेष सभेत कॉँग्रेस - राष्ट्रवादीचे गटनेते नेमके कोण ? तो विषय श्री. वालगुडे यांनी नगरसचिव वैद्य यांच्याकडे टोलवला. पक्षीय संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्तीच्या कोट्याबाबतही त्यांनी नगरसचिवांनाच विचारा असे सांगितले. त्यामुळे वैद्य यांना विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले होते.
स्थायीच्या सभेत विरोधकांचे रौद्ररूप पहावयास मिळाले होते. सदस्य निवडीनंतरही विरोधकांचा आक्रमकपणा कायम होता. त्यामुळे वैद्य हे महापौरांच्या अँंटी-चेंबरमध्ये थांबले होते. वैद्य यांच्याकडून काही बाबींचा खुलासा घ्यायचा असल्याने त्यांना बाहेर बोलवण्याची मागणी माजी महापौर अभिषेक कळमकर, संपत बारस्कर, आरिफ शेख, नसीम शेख, स्वप्निल शिंदे आदी सदस्यांनी आयुक्त व उपायुक्तांकडे लावून धरत त्यांना घेराव घातला. मात्र तरीही श्री. वैद्य हे बाहेर न आल्याने शेवटी आ. अरूण जगताप हे महापालिकेत आले.









