जिल्हाधिकारी कार्यालय नीटनेटके; अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांनी शुक्रवारी फाईलींवरील धूळ झटकली. कागदांचे गठ्ठे व्यवस्...
जिल्हाधिकारी कार्यालय नीटनेटके;
अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांनी शुक्रवारी फाईलींवरील धूळ झटकली. कागदांचे गठ्ठे व्यवस्थित ठेवत कर्मचार्यांनी आपला विभाग नीटनेटका केला. दरम्यान प्रांगणातील गौण खनिजची पकडलेली वाहनेही सायंकाळी
बाहेर काढण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग काहीसे नीटनेटके पाहायला मिळाले. पण, हा नेटकेपणा किती दिवस टिकेल, हा खरा प्रश्न आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूलदिन साजरा केला जातो. यंदा प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांतील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, यावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा घेण्यामागे कार्यालयाबरोबर कर्मचार्यांच्या कामात नीटनेटकेपणा यावा, हा उद्देश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई , रोहयो, नगरपालिका, गृह, महसूल, निवासी उपजिल्हाधिकार्यांचा स्वागत कक्ष, ग्रामपंचायत, जिल्हा पुरवठा, सामान्य प्रशासन, दुय्यम निबंधक, रेकॉर्ड शाखा, प्रांत अधिकारी कार्यालये आहेत. याशिवाय प्रमुख अधिकार्यांची दालनेही आहेत. यापैकी जो विभाग स्वच्छ असेल ,त्या विभागाचे कर्मचारी आणि त्यांचे प्रमुख, यांचा महसूलदिनी पारितोषिक देवून गौरव करण्यात येणार आहे. महसूल दिनाच्याआधी एक दिवस पुढील आठवड्यात समितीमार्फत अचानक पाहणी केली जाणार आहे. पाहणीत पितळ उघडे पडायला नको, म्हणून कर्मचारी कामाला लागले आहेत. गौण खणिज, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत शाखेतील कर्मचार्यांनी अस्ताव्यस्त पडलेल्या फायली काढून त्या व्यवस्थित ठेवल्या आहेत. स्वच्छतेत महिला कर्मचार्यांचा सहभाग मोठा होता. कार्यालयातील कपाट स्वच्छ करून कागदांचे गठ्ठे व्यवस्थित ठेवण्यात आले. काही विभागांनी मात्र यात रस दाखविला नाही. पारितोषिक नको, असे म्हणून स्वच्छता करण्यास टाळाटाळ केली.
कार्यालयांच्या दरवाजांवर लटकवलेले फलक जुनाट झाले होते. ते ही बदलण्यात आले आहेत. प्रमुख अधिकार्यांची समितीकडून विभागाची पाहणी होणार आहे. पाहणीच्यावेळी कार्यालय नीटनेटके दिसले पाहिजे. कामाला लागा, साफसफाई करा, असे फर्मानच काही विभाग प्रमुखांनी काढल्याचे एका कर्मचार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. कार्यालयातील कुठल्या कर्मचार्यांकडे कोणते काम आहे, याची एक यादीच दर्शनी भागात लावण्याच्या सूचना आहेत. या सूचनेचे केवळ सामान्य प्रशासन विभागानेच पालन केले, इतरांनी मात्र तसे न करता कर्मचारी आणि त्यांच्या पदाचे बोर्ड भिंतीवर ठोकले आहेत. तर काही ते टेबलावर ठेवले आहेत. (प्रतिनिधी) कार्यालय आवरून सुटीचा आनंद
■ समितीकडून पुढील आठवड्यात कोणत्याही क्षणी पाहणी केली जाऊ शकते. त्यामुळे बहुतांश विभाग प्रमुखांनी स्वच्छतेचे आदेश दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत. शनिवार आणि रविवार, अशी दोन दिवसांची सुटी आहे, एक सुटी कार्यालय आवरण्यासाठी देण्याचाही काहींचा आग्रह होता. मात्र कर्मचार्यांनी त्यावर शक्कल लढवित शुक्रवारी सकाळपासून स्वच्छतेची मोहीम घेऊन कार्यालय आवरले. आजच स्वच्छ करा, म्हणजे दोन दिवस सुटीचा आनंद घेता येईल, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दबक्या आवाजात सुरू होती. ■ साफसफाई करत काहिंनी टेबलाची दिशाही बदलली आहे. महसूल शाखेच्या तहसीलदार बडे यांनी टेबलाची दिशा बदलली.









