मनपा अधिकार्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई; मोबाईल बंद ठेवल्यास अहमदनगर ; महापालिकेचे सर्व खाते प्रमुख व शाखा प्रमुखांनी...
मनपा अधिकार्यांवर होणार
शिस्तभंगाची कारवाई;
मोबाईल बंद ठेवल्यास
अहमदनगर ;

महापालिकेचे सर्व खाते प्रमुख व शाखा प्रमुखांनी कार्यालयीन वेळेनंतर तसेच रजेच्या कालावधीत मोबाईल बंद ठेवल्यास किंवा कार्यालयाचा कॉल न स्वीकारल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रभारी आयुक्त विलास बालगुडे यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी कार्यालयीन आदेश सर्व अधिकार्यांना काढला असून यामध्ये म्हटले आहे की, सद्यस्थितीत शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनीचा वापर केला जातो व अधिकार्यांशी संपर्काचे ते एक प्रभावी माध्यम आहे. सदर भ्रमणध्वनीवरील विविध सेवा जसे एमएमएसद्वारेही संवाद साधून कामकाज जलदगतीने करता येते. असे असताना काही अधिकारी व कर्मचारी किरकोळ अथवा दिर्घ रजेवर असताना भ्रमणध्वनी बंद असल्यास संपर्काचे कोणतेही माध्यम उपलब्ध राहत नसल्याने कार्यालयीन वेळेनंतर दैनंदिन शासकीय कामकाज करताना अडचणी येतात. काही बाबतीतत तातडीने संपर्क साधणे आवश्यक असते, अशावेळी संपर्क न झाल्याने कामकाज करणे शक्य होत नाही. भ्रमणध्वनी बंद ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर म. ना. से. (वर्तणुक) नियम १९७९चे नियम ३ चा भंग केल्याचे समजण्यात येवून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची सर्वांनी गांभीर्याने दखल घ्यावी, असे विलास वालगुडे यांनी या आदेशात म्हटले आहे









