पावसाने चाळीतील कांद्याला बाधा अकोले तालुक्याच्या आढळा परिसरातील शेतकर्यांच्या चाळीतील कांद्याला कोंब फुटले आहेत. गणोरे : भाव नसल्य...
पावसाने चाळीतील कांद्याला बाधा

अकोले तालुक्याच्या आढळा परिसरातील शेतकर्यांच्या चाळीतील कांद्याला कोंब फुटले आहेत. गणोरे : भाव नसल्याने चाळीत ठेवलेला कांदा आता खराब होऊ लागला आहे. अकोले तालुक्याच्या आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या चाळीतील कांद्याला कोंब फुटल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
शेतकर्यांनी भाव वाढण्याच्या प्रतिक्षेत मोठा खर्च करून कांदा चाळीत ठेवला आहे. काही दिवस हा कांदा चांगला राहिला. परंतु आता पावसाचे दिवस असल्याने हवेत आद्र्रता वाढून चाळीत साठवलेले कांदे सडण्याच्या मार्गावर आहेत. चाळीतील कांद्यांना कोंब फुटले असून बुरशीजन्य प्रभावाने काळे पडल्याचे दिसून येते. पुरेशा बाजारभावाच्या प्रतिक्षेत कांदे सडून नष्ट होण्याच्या परिस्थितीत शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कमी बाजारभावात विक्रीतून उत्पादन खर्चही मिळत नसून आणखी तोटा होत असल्याचा अनुभव शेतकर्यांनी घेतला आहे. तरीसुद्धा आहे ते कांदे आणखी सडण्यापेक्षा विक्री करुन मिळेल ते पदरात पाडून घेण्याच्या मनस्थितीत शेतकरी आले आहेत.









