रिपब्लिकन सेनेचे आंदोलन ; रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले; . अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयासम...
रिपब्लिकन सेनेचे आंदोलन ; रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले;

. अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी १0 वाजेच्या सुमारास अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करणार्या रिपब्लिकन सेनेच्या पंधरा आंदोलकांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस कॉँस्टेबल सलीम शेख यांनी आंदोलकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरल्याचे सांगत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी व कोपर्डी प्रकरणातील तपासी अधिकारी शशिराज पाटोळे यांना निलंबित करावे, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले होते. आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयातून एका महिला कर्मचार्याने पोलिसांकडे तक्रार केली.पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले असता १५ ते २0 जण अर्धनग्न अवस्थेत पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी आंदोलन सुरुच ठेवत पोलिसांच्या विरोधात घोषणाजी सुरू ठेवली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून घोषणाबाजी करत प्रतिबंधक आदेशाचा भंग करत आंदोलन केल्याने १५ आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस कॉस्टेबल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी पोलिसांनी राजू आढाव, महादेव काळे, विठ्ठल रंधवे, राजू पाटोळे, अशोक गायकवाड, शहादेव रंधवे, नंदू वैरागर, मंगेश घोडेस्वार, कुंदन तुपेरे, विनायक विधाते, ज्ञानेश्वर जगधने, वसंत साबळे, सुंदर जाधव, दत्तात्रय जोगदंड, गणेश रंधवे यांना ताब्यात घेतले. न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर या आंदोलकांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा आंदोलकांनी निषेध केला. दरम्यान आंदोलनस्थळी छायाचित्र घेण्यासाठी गेलेल्या छायाचित्रकाराला पोलिसांनी अडविल्याने पोलिस आणि त्या छायाचित्रकारात शाब्दिक वाद झाला.









