नगरपालिकेने शहरातील विकासकामे सुरू करावेत : राजळे; पालिकेला राज्याच्या शासनाने पंधरा कोटी रुपयांचा निधी विकासकामासाठी दिला आहे. कामे...
नगरपालिकेने शहरातील विकासकामे सुरू करावेत : राजळे;

पालिकेला राज्याच्या शासनाने पंधरा कोटी रुपयांचा निधी विकासकामासाठी दिला आहे. कामे कोणती घ्यायची, कोणी करावयाची आणि त्यासाठीच्या तांत्रिक बाबी कधी पूर्ण करावयाच्या या चक्रात हा निधी अनेक दिवसांपासून अडकला आहे. निधी असताना कामे सुरू नाहीत. त्यामुळे पालिका अधिकारी व पदाधिकारी यांच्याविषयी जनतेमध्ये नाराजी आहे.पाथर्डी प्रतिनिधी
नगरपालिकेला शासनाने पंधरा कोटींचा विकासकामासाठी निधी दिला आहे. यामधून शहराच्या वैभवात भर घालणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन व जॉगिंग पार्क ही कामे तातडीने सुरू करावेत. अशा सूचना माजी आमदार राजीव राजळे यांनी पालिकेतील अधिकार्यांना बुधवारी दिल्या.
माजी आमदार राजीव राजळे यांनी बुधवारी दुपारी पालिका कार्यालयाला अचानक भेट दिली. मुख्याधिकारी डॉ.वसुधा कुरणावळ ,नगरसेवक बंजरंग घोडके,भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण राजगुरु,रामनाथ बंग, जमीर आतार आदि कार्यकर्ते राजळे यांच्या सोबत होते. शहराच्या विकासाच्या कामाबाबत अधिकार्यांशी राजळे यांनी चर्चा केली. त्यानंतर मुख्याधिकारी कुरणावळ व सर्व पदाधिकार्यांनी राजळे यांच्यासमवेत शहरातील आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून सुरू असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राच्या कामाची पाहणी केली. तेथुन जवळच असणार्या जॉगिंग पार्कच्या जागेला भेट देवून हे काम तातडीने सुरू करावे असे सांगितले.









