भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची तक्रार 'मैत्रेय'च्या धर्तीवर तपास होणार का? बीएनपी कंपनीचे नगरमधील बंद असलेले कार्यालय. अहमदन...
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची तक्रार
'मैत्रेय'च्या धर्तीवर तपास होणार का?
बीएनपी कंपनीचे नगरमधील बंद असलेले कार्यालय. अहमदनगर : बीएनपी या इंदोरस्थित कंपनीने नगर जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांच्या ठेवी मुदत संपल्यानंतरही परत न दिल्याने त्यांची मोठी फसवणूक झाली आहे. याबाबत एजंटांनी दीड महिन्यापूर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी दखल न घेतल्याने कंपनीने गाशा गुंडाळला. त्याविरोधात आता भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनच्या वतीने श्याम आसावा यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
बीएनपी कंपनीकडून नगर जिल्ह्यातील सामान्य लोकांना जादा परतीचे आमिष दाखवून एफडी व आरडीच्या माध्यमातून ६0 कोटींची फसवणूक केली. हे प्रकरण शुक्रवारी 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणले. त्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली. याची दखल घेत भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनचे श्याम आसावा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे खासगी तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, या ठेवीदारांनी आपली फसवणूक झाल्याबाबत दीड महिन्यापूर्वीच पोलिसांत तक्रार दिली होती, परंतु पोलिसांनी योग्य पावले उचलली नसल्याने कंपनीने गाशा गुंडाळला. वेळीच कारवाई झाली असती तर पोलिसांना बरेच धागेदोरे मिळाले असते.
कर्मचार्यांना व अधिकार्यांना ताब्यात घेऊन कार्यालयीन कागदपत्रे जप्त करता आली असती. परंतु पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर कंपनी चालकांनी मोठय़ा चलाखीने येथील सर्व संगणकीय रेकॉर्ड घेऊन पलायन केले. आता जरी गुन्हा दाखल झाला तरी त्याचा तपास होण्यासाठी व आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
राज्यात ठेवीदार हित संरक्षण कायदा आहे. तक्रार आल्यास त्वरित पोलीस यासंदर्भात कलम ३ व भा.दं.वि.चे कलम ४0६, ४२0 अन्वये गुन्हा नोंदवू शकतात. याप्रकरणीही हे शक्य होते, परंतु पोलिसांनी यात दिरंगाई केली, असे आसावा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
■ एकीकडे महाराष्ट्रात दिवसेंदिवस चिटफंड घोटाळे उघड होत असताना पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने का घेतले नाही, नुकतेच नाशिकमध्ये मैत्रेय कंपनीविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. योग्य तपास केला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने कंपनीच्या मालमत्ता जप्त होऊन ठेवीदारांच्या रकमा देण्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे आपल्या शेजारील जिल्ह्यात पोलीस एवढी तत्परता दाखवतात, परंतु आपल्या ढेपाळलेल्या पोलीस यंत्रणेमुळे उलट कंपनी सावध होऊन पळून जाते, या विसंगतीबाबत आसावा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे










