प्रतिकूलतेतही शिक्षण पूर्ण करा; अहमदनगर : गुणवंत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्य आहे. हलाखीच्या स्थितीमुळे कोणावरही शिक्षण अर्धवट सो...
अहमदनगर : गुणवंत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्य आहे. हलाखीच्या स्थितीमुळे कोणावरही शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येता कामा नये. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करावे, असे महापौर सुरेखा कदम यांनी सांगितले.
फकीरवाडा (मुकुंदनगर) येथील यशवंत विद्यालयात व श्री गणेश बालक मंदिरमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या व गरजू मुलांना संस्थेच्या वतीने मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक योगीराज गाडे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे, संचालक आसाराम म्हस्के, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते. यावेळी पालक मेळावा घेण्यात आला.
महापौर कदम यांनी समाजातील गरजू मुलांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन करून शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही व पैशाअभावी कोणाला शिक्षण सोडून देण्याची वेळ येता कामा नये, यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. उपमहापौर छिंदम यांनी गाडे शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव करून विद्यार्थ्यांसाठी संस्था राबवित असलेल्या उपक्रमांना पालकांनी साथ देण्याचे आवाहन केले. पूजा वाखरे हिला शासनाकडून मिळालेल्या शिष्यवृतीचे वाटप केले. १२५ मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. महापौर व उपमहापौर यांचा सत्कार संजय गाडे यांच्या हस्ते केला.










