जीवसृष्टीच्या अस्तित्वास अनुकूल २ ग्रह सापडले! ? अथांग ब्रह्मांडात सजीवसृष्टीच्या अस्तित्वाची शक्यता पडताळून पाहणार्या नासा...
जीवसृष्टीच्या अस्तित्वास अनुकूल २ ग्रह सापडले!

? अथांग ब्रह्मांडात सजीवसृष्टीच्या अस्तित्वाची शक्यता पडताळून पाहणार्या नासाच्या 'हबल' या अवकाश दुर्बिणीला जीवसृष्टीसाठी अनुकूल असे दोन ग्रह आढळले असून हे दोन्ही ग्रह पृथ्वीपासुन जवळपास ४0 प्रकाशवर्षे अंतरावर आहेत. जवळपास पृथ्वीएवढाच आकार असलेल्या या दोन्ही ग्रहांच्या भोवतीच्या वातावरणात सजीवांसाठी घातक असलेल्या हायड्रोजनचे प्रमाण कमी असल्याचे नासाच्या संशोधकांनी सांगितले. त्यामुळे या ग्रहांवर जीवनाच्या अस्तित्वाची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तविली जात आहे. पृथ्वीपासून ४0 प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या ट्रॅपिस्ट-१ या बटुक तार्याभोवती परिभ्रमण करणारे ट्रॅपिस्ट-१ बी व ट्रॅपिस्ट-१ सीचे वातावरण सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अनुकूल असल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यापैकी ट्रॅपिस्ट-१ बी हा दीड दिवसांत तर ट्रॅपिस्ट-१ सी हा २.४ दिवसांत त्याच्या तार्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. या दोन्ही ग्रहांचा पृष्ठभाग खडकाळ असल्याचेही नासाचे म्हणणे आहे. तिसर्या बाह्य ग्रहाचा परिभ्रमण काळ जास्त असल्याचेही नासाच्या संशोधकांनी म्हटले आहे. अत्यंत छोटी असलेली ही सौरमाला ५0 कोटी वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. गत मे महिन्यात ही सौरमाला हबलच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर एमआयटीतील संशोधकांच्या चमुने या सौरमालेचे निरीक्षण करीत त्याच्या तापमान व आकाराचे विश्लेषण करीत येथे सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अनुकूल वातावरण असण्याचा अंदाज व्यक्त केला. शास्त्रज्ञ सध्या या ग्रहांविषयी अधिक संशोधन करीत आहेत. नेचर या नियतकालिकात याविषयीचे संशोधन विस्तृतपणे प्रकाशित झाले आहे









