मुख्य कार्यकारी अधिकार्यांची नियुक्ती नियमाप्रमाणेच; अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांची नि...
मुख्य कार्यकारी अधिकार्यांची नियुक्ती नियमाप्रमाणेच;

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांची नियुक्ती ही नियमाप्रमाणेच करण्यात आलेली आहे. संचालक मंडळातच त्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय झालेला आहे. त्यामुळे यात फसवणूक व दिशाभूल करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
कार्यकारी संचालक पदाच्या नियुक्तीत नियम डावलून संचालक मंडळ व न्यायालयाची फसवणूक करण्यात आली, अशी खासगी फिर्याद बॅँकेचे नवृत्त अधिकारी जॉन खरात यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने बॅँकेचे माजी अध्यक्ष खेमनर, कार्यकारी संचालक व सरव्यवस्थापक यांच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला चालविण्याचा आदेश केला आहे. यासंदर्भातील वृत्त आज 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात खेमकर यांची भूमिका जाणून घेतली असता ते म्हणाले, जिल्हा बॅँकेचा कारभार हा मोठा असल्याने येथे सक्षम व अनुभवी कार्यकारी संचालक हवा होता. वर्पे यांना राज्य सहकारी बॅँकेतील कामाचा दीर्घ अनुभव आहे. नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या मोठी आहे. वर्पे यांनी राज्य बॅँकेत यासंदर्भातील कामकाज पाहिलेले आहे. त्यामुळे गुणवत्ता व अनुभव या जोरावर त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय संचालक मंडळाने पूर्ण विचाराअंती घेतला आहे. हा निर्णय मी एकट्याने घेतलेला नाही.
वर्पे संगमनेर तालुक्यातील असले तरी त्यांचा व आपला तत्पूर्वी परिचय देखील नव्हता. त्यांची नियुक्ती करावी, असा कोणाचा दबावही नव्हता. त्यांच्या नियुक्तीत कोणाचेही हितसंबंध नाहीत. खरात यांना वयाच्या कारणामुळे डावलण्यात आलेले नाही. न्यायालयात आपण हे सगळे म्हणणे मांडू, असे ते म्हणाले.
खरात यांच्याशी संपर्क साधला असता या नियुक्तीत नियम डावलले गेले असल्याचे सर्व पुरावे आपण न्यायालयासमोर सादर केले असल्याचे ते म्हणाले.









