मुलीस पळविणार्यांसह तर्राट पोलिसांना डांबले; वाहनाचीही तोडफोड; विद्यार्थिनीस पळवून नेणारे आरोपी व तर्राट पोलिसांना ग्रामपंचायत कार्या...
मुलीस पळविणार्यांसह तर्राट पोलिसांना डांबले; वाहनाचीही तोडफोड;

विद्यार्थिनीस पळवून नेणारे आरोपी व तर्राट पोलिसांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबल्यानंतर भांबोरा गावात\जमलेले ग्रामस्थ.
. कर्जत तालुक्यातील कोपर्डीची घटना ताजी असतानाच याच तालुक्यात शुक्रवारी नववी इयत्तेतील एका विद्यार्थिनीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जागृत ग्रामस्थांमुळे या मुलीची सुखरूप सुटका झाली. संतप्त ग्रामस्थांनी विद्यार्थिनीस पळवून नेणार्या तरुणांसह नशेत तर्र असलेल्या पोलिसांनाही ग्रामपंचायत कार्यालयात रात्रीपर्यंत कोंडून ठेवले होते. पोलीस अधीक्षक गावात गेल्यानंतर या पोलिसांची रात्री दहा वाजता सुटका झाली. दरम्यान, रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांनी यातील सय्यद व निकम या दोन पोलिसांना निलंबित केले आहे.
भांबोरा-दुधवडी रस्त्याने विद्यार्थिनी शाळेत जात असताना रणदिवे वस्तीजवळ दबा धरुन बसलेल्या पाच तरुणांनी तिला अडविले व ओढत उसाच्या शेतात नेले. त्यांचा दुष्ट हेतू लक्षात येताच तिने जीवाच्या आकांताने ठोकलेली आरोळी तिच्या चुलत भावाने ऐकली. त्याने लगेच गावकर्यांना आवाज देत शेताकडे धाव घेतली. त्यांनी सात-आठ जणांच्या मदतीने या मुलीची सुटका केली. ग्रामस्थ जमल्याने तरुणांनी पळ काढला. यातील तिघांना पाठलाग करुन पकडले व चोप दिला. माहिती मिळाल्यानंतर राशीन दूरक्षेत्र चौकीचे दोन पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड तेथे पोहोचले. त्यांनी आरोपींना जीपमध्ये बसविले.
ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तीन आरोपींसह पोलिसांनाही ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. तसेच पोलीस गाडीवर दगडफेक केली. पोलिसांच्या जीपमध्ये दारुच्या बाटल्या आढळल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला. पोलिसांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले. त्यामुळे भांबोरा गावात तणावपूर्ण वातावरण होते. नगरहून पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी व उपअधीक्षक विजय लगारे रात्री घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचार्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. पोलीस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधीक्षकांनी ग्रामस्थांना दिले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास पोलिसांची ग्रामस्थांनी सुटका केली. सहा तास पोलिसांना ग्रामस्थांनी कोंडले. आरोपींसह पोलिसांवरही कारवाईची मागणी आहे. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.









