धूमस्टाईलने शेतकर्याचे साडेतीन लाख लांबविले; अहमदनगर : शहरासह उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या स...
अहमदनगर : शहरासह उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास केडगाव येथे दुचाकीवर धूमस्टाईलने आलेल्या चोरट्यांनी शेतकर्याचे साडेतीन लाख रुपये घेऊन पोबारा केला तर गुरुवारी दुपारी सावेडीतील कलानगर येथून ३0 हजार रुपये किमतीचे महिलेच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरट्यांनी ओरबाडून नेले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
निमगाव वाघा येथील शेतकरी व दूध डेअरीचालक आनंदा मुंजाबापू जाधव यांनी शहरातील स्वास्तिक चौकातील अँक्सिस बँकेतून ३ लाख ४५ हजार ३५३ रुपये काढून ते केडगाव येथे गेले होते. त्यांना जिल्हा बँकेच्या केडगाव शाखेत पीकविम्याचा हप्ता भरावयाचा होता. यावेळी मात्र, बँक कर्मचार्यांची जेवणाची सुट्टी झाल्याने ते चहा पिण्यास केडगाव येथील सोनेवाडी रस्त्यावर आले. तेथे मात्र, त्यांची दुचाकी पंर झाल्याने ते तेथे पंर काढत होते. याचवेळी पल्सर या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जाधव यांच्या हातात असलेली पैशाची पिशवी हिसकावून धूम ठोकली.
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी या चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले. घटनेनंतर जाधव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुरुवारी शहरातील सावेडी येथील कलानगर चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अलका अरविंद गरगटे यांनी फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान शहरात सुरू असलेले चोर्यांचे सत्र सुरू असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे










