निघेाज कुंड पाण्याखाली पारनेर : प्रतिनिधी : पुणे जिल्हयातील कुकडी धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मुसळधार पाउस सुरू असल्याने कुकडी न...
निघेाज कुंड पाण्याखाली
पारनेर : प्रतिनिधी : पुणे जिल्हयातील कुकडी धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मुसळधार पाउस सुरू असल्याने कुकडी नदीला तब्बल 27 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे निघोज येथील कुंड परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला असून नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. दरम्यान, सायंकाळी साडेपाचनंतर पाण्याचा वेग कमी करण्यात येऊन 19 हजार 1870 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याचे तहसीलदार भारती सागरे यांनी सांगितले.
तालुक्यात पावसाची केवळ रिमझिम सुरू असली तरी कुकडी प्रकल्प धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कुकडी नदी परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुकडी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तब्बल 27 हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. नागरीकांनी हे पाणी पाहण्यासाठी कुंड परिसरात मोठी गर्दी केली आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 27 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर मात्र वेग कमी करण्यात येऊन साडेपाच नंतर 19 हजार 870 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी 19 हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले होते, त्यावेळी कुंडावरील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली होती. तेथून पुणे जिल्ह्याशी असणारा संपर्कही तुटला होता.
कुकडी नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठी पोलिस तसेच महसूल कर्मचारी तळ ठोकून आहेत. या परिसरातील ठाकरवाडी तसेच विविध वस्त्यांवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. घरांमधील सामानासह जनावरेही स्थलांरीत करण्यात आले असून, तहसीलदार भारती सागरे या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. कुकडी धरण प्रकल्पांर्गत असलेले येडगांव धरण पूर्ण भरण्यास केवळ एक मीटर शिल्लक राहिल्याने पाटबंधारे विभागाने नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. नदीत किती क्सुसेक्स वेगाने पाणी सोडायचे या निर्णयापेक्षा पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणास धोका नको म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
कुकडी नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने पारनेर तालुक्याला पिण्याचे पाणी पुरवठा करणा-या कोहकडी येथील उद्भवास पाणी उपलब्ध झाले असून गेल्या काही दिवसांपासून टँकर भरण्याचा निर्माण झालेला पेच मात्र सुटला आहे. धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने कुकडी तसेच पिंपळगांव जोगे धरणाच्या कालव्यांमधून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. कालव्यांना पाणी आल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही काळासाठी मार्गी लागण्यास मदत होणार आहे.










