खड्डे बुजविण्याला अखेर मुहूर्त; अहमदनगर : पावसामुळे शहरातील रस्त्यांवर झालेल्या खड्डय़ांनी त्रस्त झालेल्या नगरकरांना महापौर सुरेखा कदम...
खड्डे बुजविण्याला अखेर मुहूर्त;

अहमदनगर : पावसामुळे शहरातील रस्त्यांवर झालेल्या खड्डय़ांनी त्रस्त झालेल्या नगरकरांना महापौर सुरेखा कदम यांनी थोडा दिलासा दिला आहे. गुरुवारी दुपारपासून शहरातील खड्डे बुजविण्याला प्रशासनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. निविदा बाजुला ठेवत ठेकेदारांकडूनच खड्डे बुजविण्याचे महापौरांनी आदेश दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली.
शहरात सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले होते. खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने फेरनिविदा काढली होती. मात्र यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागणार होता. त्यामुळे महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी निविदा बाजुला ठेवून खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याबाबत गेल्या दोन दिवसांपासून केवळ बैठकाच सुरू आहेत. त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने महापौर कदम यांनी गुरुवारी सकाळी तातडीने अधिकार्यांची बैठक बोलावली. या बैठकीला उपायुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त भालचंद्र बेहरे, शहरप्रमुख संभाजी कदम,गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक विक्रम राठोड, दिलीप सातपुते, योगिराज गाडे, शहर अभियंता व्ही. जी. सोनटक्के, मुख्यलेखाधिकारी राजेंद्र झिरपे, अभियंता एस.आर. निंबाळकर, एम. एस. पारखे आदी उपस्थित होते.
बैठकीत महापौर म्हणाल्या, शहरातील खड्डय़ांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिकांच्या रोज तक्रारी येत आहेत. त्यामुळे विविध रस्त्यांच्या कामाचे कायार्रंभ आदेश ज्या ठेकेदारांना दिले आहेत, त्या ठेकेदारांना खड्डे बुजविण्याचे सांगावे, असे आदेशच महापौरांनी दिले. जास्त खड्डे असलेले रस्ते सर्वात आधी बुजवावेत. ज्या रस्त्यांच्या कामांना अद्याप मंजुरी दिलेली नाही, त्या रस्त्यावरील खड्डे प्राधान्याने बुजवावेत. गणेशोत्सव लक्षात घेवून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आतापासूनच नियोजन करावे. याबाबत ठेकेदारांना लेखी सूचना द्याव्यात.
उपायुक्त अजय चारठाणकर यांनी संबंधित अभियंत्यांना रस्त्याचे पॅचिंग सुरू असताना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील अन्य रस्त्यांमधील खड्डे बुजविण्याबाबतही स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही चारठाणकर यांनी दिले.
.
|









