अन्यथा आंदोलन ; 'राष्ट्रवादी युवक'चा इशारा साथीच्या आजारांबाबत त्वरित उपाययोजना करा; अहमदनगर; शहरात डासांच्या प्रा...
अन्यथा आंदोलन ; 'राष्ट्रवादी युवक'चा इशारा
साथीच्या आजारांबाबत त्वरित उपाययोजना करा;
अहमदनगर;

शहरात डासांच्या प्रादरुभावामुळे पसरलेल्या साथींच्या आजाराबाबत त्वरित उपाययोजना करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाच्या निषेधार्थ तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रभारी आयुक्त विलास वालगुडे यांची भेट घेवून त्यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, उपाध्यक्ष सारंग पंधाडे, विजय वाघ, नगरसेवक आरिफ शेख, पियुष कटारिया, मतिन सय्यद, सचिन क्षिरसागर, अनिकेत भंडारी, सचिन दळवी, पंकज भुतारी आदी उपस्थित होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या पावसाळ्याचे दिवस असून, नगर शहर व परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांचा प्रादरुभाव फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती फार झपाट्याने होत असून, चाणक्य चौक परिसर, भोसले आखाडा, माणिकनगर, विनायकनगर, आगरकर मळा या परिसरात डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहे. ही फार गंभीर स्वरुपाची बाब असून, आरोग्य विभागामार्फत त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठी प्रत्येक प्रभागात जास्तीत जास्त कर्मचारी नेमून आरोग्य प्रबोधन व फवारी केली जावी, जेणेकरुन साथीचे आजार पसरणार नाही.
यावेळी शिष्टमंडळाला श्री.वालगुडे यांनी शहरात डासांचा वाढलेला प्रादरुभाव रोखण्यासाठी महापालिकेने अँक्शन प्लॅन तयार केला असून, दररोज प्रत्येक प्रभागनिहाय औषध फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागासाठी दोन कर्मचारी नेमण्यात आले असून, ३४ प्रभागांमध्ये एकूण ६८ कर्मचारी नेमण्यात आले असून, सोमवारपासून पुढील चार महिने ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन श्री.वालगुडे यांनी शिष्टमंडळास दिले आहे.









