यशवंत विद्यालयातील १२५ विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप; अहमदनगर : गुणवंत विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्य आहे. हलाक...
यशवंत विद्यालयातील १२५ विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप;

अहमदनगर : गुणवंत विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्य आहे. हलाकीच्या स्थितीमुळे कोणावरही शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येता कामा नये. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन महापौर सुरेखा कदम यांनी केले. संस्थेचे संजय गाडे अध्यक्षस्थानी होते. फकीरवाडा (मुकुंदनगर) येथील यशवंत विद्यालयात व श्री गणोश बालक मंदिरामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या व गरजू मुलांना संस्थेतर्फे मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक योगीराज गाडे उपस्थित होते. संचालक आसाराम म्हस्के, ज्ञानदेव पांडूळे उपस्थित होते. पालक मेळावा यावेळी झाला. महापौर कदम यांनी समाजातील गरजू मुलांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही व पैशाअभावी कोणाला शिक्षण सोडून देण्याची वेळ येता कामा नये यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे सांगितले. उपमहापौर छिंदम यांनी गाडे शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव करून गरीब विद्यार्थ्यांसाठी संस्था करीत असलेल्या प्रयत्नांना पालकांनी साथ देण्याचे आवाहन केले. पूजा वाखरे हिला शासनाकडून मिळालेल्या शिष्यवृतीचे वाटप करण्यात आले. उद्धव गुंड यांनी प्रास्ताविक केले. शाळेतील १२५ मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक पालक संघाची व शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना यावेळी करण्यात आली. संजय गाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. गाडे यांनी मुकुंदनगर व फकीरवाडा येथील प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची विनंती केली









