कामरगावात चिमुकल्यांचा जीव टांगणीला; अहमदनगर : कामरगाव (ता. नगर) येथे महावितरणच्या अक्षम्य दिरंगाईमुळे विजेच्या खांबावरील तारा व विद्य...
कामरगावात चिमुकल्यांचा जीव टांगणीला;
अहमदनगर : कामरगाव (ता. नगर) येथे महावितरणच्या अक्षम्य दिरंगाईमुळे विजेच्या खांबावरील तारा व विद्युत रोहित्रामुळे चिमुकल्यांसह ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
प्राथमिक शाळेच्या आवारातच विजेच्या तारा उघड्या पडल्याने व गावातील तारा थेट हात लागेल इतक्या खाली वाकल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती गावकर्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी सांगूनही महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची गावकर्यांची तक्रार आहे. कामरगाव जि. प. शाळेच्या आवारात विद्युत रोहित्र आहे. त्याची देखभाल होत नसल्याने याची दुरवस्था झाली आहे. मुख्य वीजवाहक तारांचे आवरण खराब होऊन कुजले आहे. यामुळे वीजवाहक तारा उघड्या पडल्या आहेत. शाळेतील मुलांचा नेहमीच या परिसरात वावर आहे. यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या रोहित्राच्या जवळच अंगणवाडीतील लहान मुले येथूनच ये-जा करत असतात. सध्या पावसाचे दिवस असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते.
गावातील कामक्षा माता मंदिर परिसरात रस्त्यावरच वीज खांब असून त्यांच्या तारा असुंतलनामुळे निखळल्या आहेत.
त्या इतक्या खाली वाकल्या आहेत की, चालता चालता कोणाचाही हात तारेला लागून जीवितहानी होऊ शकते. नगर- पुणे राज्यमार्गालगत ही अशीच स्थिती आहे. गावकर्यांनी याकडे स्थानिक कर्मचार्यांचे लक्ष वेधूनही त्याचा उपयोग झाला नाही. ठेकेदारी पद्धतीने काम सुरू असल्याने या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत तुकाराम कातोरे यांच्यासह प्रफुल्ल भुजबळ, अमित साठे, शुभम महापुरे, गोरख ठोकळ, शाम जाधव हे महावितरणला निवेदन देणार आहेत.
(प्रतिनिधी) आम्ही महावितरणच्या स्थानिक व वरिष्ठ अधिकार्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली, मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. आता दुर्घटना होण्याची वाट पाहिली जात आहे का? हे समजत नाही. दुर्घटना होण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे.










