तीन हजार फायली 'रेकॉर्ड'कडे या विभागांनी पाठविल्या फाइल; ■ महसूल-७८२, करमणूक-९२, पुरवठा-२0५, विशेष कार्यकारी दंडाधिकारी-...
तीन हजार फायली 'रेकॉर्ड'कडे
या विभागांनी
■ महसूल-७८२, करमणूक-९२, पुरवठा-२0५, विशेष कार्यकारी दंडाधिकारी-७७५, अपिल कक्ष-१२४, गृहशाखा-७२२ अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, तीन हजार फायली सुरक्षित स्थळी रेकॉर्ड विभागात पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात फायली रेकॉर्ड विभागात गेल्याने कार्यालये चकाचक झाली आहेत.महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका, गृहशाखा, करमणूक, पुरवठा, महसूल, ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन, सेतू, रोहयो, कूळ कायदा, पुनर्वसन विभागाच्या कर्मचार्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. कार्यालयांसमोरील फलकांपासून ते कर्मचार्याचे पद आणि काम, याचेही फलक कार्यालयांत लावण्यात आले आहेत. स्वच्छतेबरोबरच कार्यालयातील दप्तर व्यवस्थित लावण्यात आले असून, निकामी फायली निकाली काढण्यात आल्या आहेत. ज्या फायली कामाच्या नाहीत, अशा फायली तपासून त्या रेकॉर्ड विभागाकडे पाठविण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहेत. आतापर्यंत विविध विभागांनी २ हजार ७00 फायली रेकॉर्ड विभागाकडे पाठविल्या असून, रेकॉर्ड विभागाकडून त्या कापडात बांधून ठेवण्यात येत आहेत. प्राप्त झालेल्या फायलींची ऑनलाईन नोंदणी करून त्याची वर्गवारी करण्यात आली असून, फायली ठेवण्यासाठी नवीन खोलीही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे रेकॉर्ड विभागातील कर्मचार्यांकडून सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड विभागात सुमारे एक लाख फायली ठेवण्यात आल्या आहेत. त्यात पुन्हा तीन हजार फायलींची भर पडली असून, त्यात पुढील काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विभागप्रमुखांनी फायली निकाली काढून त्या रेकॉर्ड विभागाकडे पाठविण्याची मोहीमच सध्या हाती घेतली आहे.










