सभापतीपदासाठी जाधव-फुलसौंदर चर्चेत ..तर सभापती सहा महिनेच पाच ऑगस्टला निवडणूक : भाजपाची संधी हुकली अहमदनगर : महापालिकेच्या स्थाय...
सभापतीपदासाठी जाधव-फुलसौंदर चर्चेत
..तर सभापती सहा महिनेच
पाच ऑगस्टला निवडणूक : भाजपाची संधी हुकली
अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी ५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे. स्थायी समितीमध्ये १४ सदस्य शिवसेनेच्या गोटातील असून त्यापैकी ६ सदस्य सेनेचे असल्याने शिवसेनेचाच सभापती होणार आहे. त्यामध्ये सुनीता फुलसौंदर आणि सचिन जाधव यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामध्ये जाधव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिवसेना-भाजप युतीच्या सत्तेमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदापासून भाजपला प्रथमच दूर राहण्याची वेळ आली आहे.
महापालिकेच्या २0 जुलै रोजी झालेल्या महासभेत आठ सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर स्थायी समितीच्या १६ सदस्यांचा कोरम पूर्ण झाला. त्यामुळे नगरसचिव यांनी महासभेत नियुक्त झालेल्या सदस्यांच्या नावासह सभापती निवडणुकीचा प्रस्ताव नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठविला. त्यानंतर विभागीय आयुक्तांचे गुरुवारी सायंकाळी महापालिकेला निवडणूक घेण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले. शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षेतखाली ही निवडणूक होईल. स्थायी समितीमध्ये सध्या शिवसेनेचे ६ सदस्य आहेत. या सहा सदस्यांसह उर्वरित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असे मिळून एकूण १४ सदस्य शिवसेनेच्या बाजूने आहेत. त्यामुळे सभापती हा शिवसेनेचाच होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. स्थायीमध्ये भाजपाचे दोन सदस्य आहेत. यापूर्वीच्या शिवसेना-भाजपाच्या सत्ताकाळात प्रत्येकवेळी स्थायी समितीचे सभापतीपद भाजपच्या वाट्याला जायचे. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने सेनेच्याविरोधात आघाडी केल्याने यावेळी भाजपला या पदापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. भाजपाचे दोन सदस्य स्थायी समितीमध्ये आहेत. त्यामध्ये श्रीपाद छिंदम आणि उषा नलावडे यांचा समावेश आहे. त्यापैकी छिंदम हे उपमहापौर आहेत, तर नलावडे हे आगरकर गटाचे असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांनी संपुष्टात येणार आहे. सचिन जाधव यांनी अडीच वर्षांपूर्वी महापौरपदाची निवडणूक लढविली होती. शिवाय ते माजी आमदार अनिल राठोड यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. सुनीता फुलसौंदर याही सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. मात्र सेनेच्या बैठकीत जाधव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. पद मिळण्यासाठी इच्छा व्यक्त करणे, ही लोकशाही आहे. मात्र जे सेनेच्या बैठकीत निश्चित होईल, त्याला आमचा विरोध नसेल, असे स्थायी समितीच्या सदस्यांनी सांगितले. ■ १ फेब्रुवारी ते ३१ जानेवारी असा एक वर्षाचा सभापतीपदाचा कार्यकाळ आहे. त्यामुळे ५ ऑगस्टला निवडलेला सभापतीचा कार्यकाळ हा उर्वरित कार्यकाळ असणार आहे. एक वर्षाच्या कालावधीमधील सहा महिने आधीच संपले आहेत. त्यामुळे पुढचा सभापती १ फेब्रुवारी २0१७ च्या आधी निवडला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
■ जो सभापती निवडला जाईल, त्याचा कालावधी एक नव्हे तर सहा महिन्यांचाच राहणार आहे. मात्र आर्थिक निर्णय घेण्यासाठी स्थायी समिती आवश्यक असून ती सेनेच्याच ताब्यात राहणार आहे, असे सांगण्यात येते. ..तर सभापती सहा महिनेच










