पोलिसांना डांबून ठेवणार्यांवर गुन्हा दाखल; अहमदनगर : कर्जत तालुक्यातील दुधोडी येथे आरोपीस ताब्यात घेण्यास गेलेल्या पोलिसांच्या वाहना...
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील दुधोडी येथे आरोपीस ताब्यात घेण्यास गेलेल्या पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करून त्यांना डांबून ठेवल्याने तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याने शनिवारी रात्री उशीरा कर्जत पोलीस ठाण्यात भांबोरा येथील १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक वैभव महांगरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
२९ जुलै रोजी भांबोरा येथील अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी पोलीस कॉस्टेबल एम.वाय सय्यद, के. एच. निकम, के. एफ कोळेकर व पोलीस मित्र शेखर निंभोरे हे दुधोडी येथे आरोपीस ताब्यात घेण्यास गेले होते. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सरकारी वाहनातून दुधोडी रस्त्याने येत असताना भांबोरा येथील १२५ जणांनी पोलिसांच्या वाहनाला गाड्या अडव्या लावून आरोपींसह पोलिसांनाही मारहाण केली. तसेच शासकीय वाहनाची तोडफोड करत सरकारी कामात अडथळा आणून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आणि आरोपींसह पोलिसांनाही ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले. असे या फिर्यादित म्हटले आहे.










