नांदगावशिंगवे अत्याचार प्रकरण : आरोपी मल्हारी उमाप याला ८ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी अहमदनगर ; नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथील अ...
अहमदनगर ; नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी मल्हारी सखाराम उमाप याला पोलिसांनी अटक करुन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एच.देशपांडे यांचेसमोर हजर केले असता त्याला दि. ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथील अल्पवयीन मुलीला भांडी घासण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपातील फरारी झालेला मल्हारी सखाराम उमाप याला स्थानिक गुन्हेशाखेच्या पेालिसांनी पांढरीपूल येथील मिरी रोडवर मोठय़ा शिताफिने अटक करुन एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याची न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मल्हारी उमाप याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एच.देशपांडे यांचेसमोर हजर केले. यावेळी सरकार पक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील अँड़ पुष्पा कापसे-गायके यांनी युक्तिवाद केला. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून आरोपीची डीएनए चाचणी करावयाची आहे. या गुन्ह्यात आरोपीने वापरलेले कपडे त्याने औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकिन येथे ठेवले आहेत. ते जप्त करावयाचे आहेत. गुन्हा घडण्याअगोदर आरोपींनी कट केला होता का? याचा तपास करावयाचा आहे. या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना आळा बसावा या हेतूने आरोपीला जास्तीतजास्त पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी उमाप याला दि. ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
|










