ऑपरेशन डाऊच रेस्क्यू' यशस्वी २२ जणांची सुटका : कोपरगावात पूर ओसरताच जनजीवन पूर्ववत अखेर मोहीम फत्ते; गोदावरीला आलेल्या पुर...
ऑपरेशन डाऊच रेस्क्यू' यशस्वी
२२ जणांची सुटका : कोपरगावात पूर ओसरताच जनजीवन पूर्ववत
अखेर मोहीम फत्ते;
गोदावरीला आलेल्या पुरात डाऊचच्या पुराण बेटावर २२ नागरिक अडकून पडले होते. त्यांना वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. आ. स्नेहलता कोल्हे यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, तहसीलदार प्रशांत खेडेकर यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकास पाचारण केले. मात्र पाण्याचा वेग व खोलीचा अंदाज घेतल्यावर पथकाने नकार दिल्याने मोठा पेच निर्माण झाला. परंतु सुदैवाने गोदावरीचा विसर्ग कमी होत गेला. गुरूवारी सकाळी एनडीआरएफचे प्रमुख गगन तिवारी व त्यांच्या सहकार्यांनी बोटीच्या सहाय्याने पाण्यात उतरून ३८ तासांपासून बेटावर अडकलेल्या २२ जणांची सुखरूपपणे सुटका केली. कोपरगाव : गोदावरी नदीचा पूर ओसरताच शहरास जोडणारा छोटा पूल वाहतुकीस खुला झाला. स्थलांतरित करण्यात आलेली कुटुंब पुन्हा घरी परतल्याने जनजीवन पूर्ववत झाले. तर डाऊचच्या बेटावर अडकलेल्या २२ जणांना तब्बल ३८ तासांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने गुरूवारी सकाळी सुखरूपपणे बाहेर काढले.
गेल्या दोन दिवसांपासून नांदूर मधमेश्वर धरणातून सुमारे अडीच लाख क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे कोपरगाव शहरासह नदी काठच्या ११ गावांना फटका बसला. नदीवरील छोट्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद झाली. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने शहर व तालुक्यातील एकूण ३0५ कुटुंबांचे विविध शाळा-महाविद्यालयांच्या खोल्यांमध्ये स्थलांतर करून निवारा देण्यात आला. संजीवनी व कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना, नगरपालिका, साई संस्थान यांच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त कुटुंबातील लोकांच्या अन्न, पाणी व औषधोपचाराची व्यवस्था केली. दारणा व गंगापूर धरण क्षेत्रात बुधवारी सायंकाळी पाऊस थांबल्याने हळूहळू गोदावरीचा विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे रात्रीतून नदीचे पाणी ओसरले. नदीचे पाणी पातळी खाली गेल्याने बुडालेला छोटा पूल वाहतुकीस खुला झाला. खंदक नाल्याचे पाणी कमी झाल्याने मुख्य रस्ता चालू झाला. पावसाची संततधार व नदीच्या पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत झाले.










