पारनेर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेस प्रारंभ; पारनेर; जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय नगर व पारनेर तालुका क्रीडा संघटना व संत निळोबार...
पारनेर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेस प्रारंभ;
पारनेर;
जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय नगर व पारनेर तालुका क्रीडा संघटना व संत निळोबाराय विद्यालय, राळेगणसिध्दी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पारनेर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत चौदा व सतरा वर्षे वयोगटात राळेगणसिध्दी, पारनेर, रांजणगाव मशिद, निघोज, वाडेगव्हाण, जामगाव भाळवणी, संघानी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पारनेर तालुका क्रीडा संकुलावर गुरूवारी सकाळी माजी सभापती गंगाराम बेलकर, बाजार समिती सभापती अरूण ठाणगे, पारनेर नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती सुरेखा भालेकर,नगरसेविका शशिकला शेरकर, शंकर नगरे, रामदास पठारे, तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय औटी, बाळासाहेब मते, बापूराव होळकर, सुनील गायकवाड, बाळासाहेब धावडे, सुभाष पठारे, शाहुराव औटी, रविशंकर मोरे, विनायक उंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी नगरसेविका भालेकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांपासून चालना मिळत असून, देशातील मोठय़ा मोठय़ा स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील मुले आपले व आपल्या गावाचे नाव उज्जवल करीत आहेत. तर माजी पंचायत समिती सभापती गांगरम बेलकर म्हणाले की इंग्रजी माध्यमांच्या शाळा खेळाकडे दुर्लक्ष करीत असून, मराठी माध्यमांच्या शाळा या क्रीडा क्षेत्रात सहभाग नोंदवित असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर विजय मिळवीत आहेत. या स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतिय येणार्या संघाना आपण टी शर्ट देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
शिक्षकांच्या अनास्थेमुळे सामन्यांना उशीर
काही क्रीडा शिक्षक संघ घेवून आल्यावर खेळाडूंना सोडून दुसरीकडे जावून बसले. तर काहींनी पंच व गुणलेखक म्हणून काम करण्यास अनास्था दाखविल्याने सामने सुरू होण्यास दुपार झाली. राळेगणसिध्दी व पारनेरच्या युवकांना बरोबर घेवून काही शिक्षकांनी नंतर सामने सुरळीत पार पाडले. शिक्षकांच्या या अनास्थेवर विद्यार्थ्यांनीही नाराजी व्यक्त केली. या सामन्यात पंच म्हणून बाबाजी साळुंके, प्रशांत मापारी, शरद केदारी, प्रकाश दाते,ऋषीकेश औटी, सूरज कानगुडे यांनी काम पाहिले.










