कर्जतला राज्यव्यापी कोपर्डी मराठा संसद कार्यक्रम; अहमदनगर कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेविरोधात संपूर्ण राज्यातील मराठा समाज...
कर्जतला राज्यव्यापी कोपर्डी
मराठा संसद कार्यक्रम;
अहमदनगर
 कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेविरोधात संपूर्ण राज्यातील मराठा समाजामध्ये संतापाची भावना आहे. समाजाने रस्त्यावर उतरून व्यापक निषेध नोंदवला आहे. कर्जत येथील सहा तास चाललेला रास्तारोको, न्यायालयाच्या आवारात आरोपींवर केलेली अंडेफेक, प्रमुख दलित नेत्यांना कोपर्डीत येण्यास झालेला विरोध, औरंगाबाद येथे मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने काढलेला महामोर्चा अशा विविध स्वरूपात अनेक ठिकाणी कोपर्डी घटनेबाबत समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. या घटनेसह मराठा समाजाला भेडसावणार्या विविध समस्यांबाबत समाजात प्रचंड खदखद आहे. याबाबत विचारविनिमय करून तातडीने निर्णय घेण्यासाठी दि.२८ आँगस्ट रोजी स.११वा. कर्जत येथे राज्यव्यापी कोपर्डी मराठा संसद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती शिवप्रहार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष इंजि. संजीव भोर यांनी दिली.
दि.१५ रोजी कर्जत येथे समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रविणदादा घुले, विजयराव तोरडमल, बाळासाहेब साळुंके, अँड़कैलासराव साळुंके, झुंबरराव सुद्रीक या मान्यवरांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली आहे. औरंगाबादच्या ऐतिहासिक मोर्चाचं अनुकरण इतर अनेक ठिकाणी होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. मात्र केवळ कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून विस्कळीत आंदोलने, मोर्चे काढल्याने अपेक्षित दबाव निर्माण होणार नाही. या घटनेच्या निषेधासह समाजाच्या इतर ज्वलंत समस्यांना आंदोलनातून वाचा फुटायला हवी अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.
|