आरोपीला अटक न केल्यास आंदोल न; अहमदनगर: नांदगाव शिंगवे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला चोवीस तासात अटक करा, अन्यथा...
अहमदनगर: नांदगाव शिंगवे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला चोवीस तासात अटक करा, अन्यथा ग्रामस्थांसह रास्ता रोको करण्याचा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.
आ. जगताप यांनी नांदगाव शिंगवे येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. गावचे सरपंच गुंड, उपसरपंच सुजित जाधव, राजू आघाव, श्याम सोनवणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेश्मा चव्हाण-आठरे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक करावी, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जगताप यांनी दिला. गावात मोठय़ा प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहेत. जिल्ह्यातील वाळूतस्करीही वाढली असून, त्यातून अशा घटना घडत आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकापाठोपाठ एक घटना जिल्ह्यात घडत असल्याने जिल्ह्याची प्रतिमा डागळली आहे. पोलिसांचा जरब राहिला नसल्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घेवून तातडीने प्रमुख आरोपीला अटक करावी, अन्यथा ग्रामस्थांसह रस्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी जगताप यांनी दिला.










