'स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाचे मोठे बलिदान' ; अहमदनगर- जगात २0 व्या शतकात घडलेल्या काही घटनांमुळे मुस्लिम समाजाकडे जग...
'स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाचे मोठे बलिदान' ;
अहमदनगर-

जगात २0 व्या शतकात घडलेल्या काही घटनांमुळे मुस्लिम समाजाकडे जगाचा बघण्याचा दृष्टीकोनात फार बदल झाला आहे. पण घडलेल्या घटनांचा व समाजाचा काडीचाही संबंध नसताना या समाजास शंकेच्या नजरेला सामोरे जावे लागत आहे. या समाजानेही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे बलिदान दिले असून याबाबतची माहिती मखदूमच्या विशेषांकाच्या माध्यमातून मिळाली आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अली एम. शम्सी यांनी केले.
मखदूमने रमजान व स्वातंत्र दिनानिमित्त 'आजादी का आंदोलन और
भारतीय मुसलमान' हे विशेषांक प्रकाशित केले. यावेळी अली एम. शम्सी बोलत होते. प्रमुख पाहुणो म्हणून बुरहाणी कॉलेजचे उर्दू विभाग प्रमुख डॉ.कासिम इमाम, रॉयल सोसायटीच्या रेहाना उंद्रे, उर्दू साहित्य अकादमीचे सदस्य फारुक सय्यद, नदीम माहिर आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना शम्सी म्हणाले की, शालेय व महाविद्यालयांमध्ये इतिहासाचे एवढे सखोल धडे शिकविले जात नाहीत. इतिहास दिवसेंदिवस बिघडविण्याचे कारस्थान काही शिक्षित वर्ग करत आहे म्हणून युवा पिढीने इतिहास जाणून नाही घेतला तर भविष्यात चुकीच्या व खर्या इतिहासामध्ये फरक करणो कठीण होणार असल्याचे ते म्हणाले.
प्रास्तविकात डॉ.कमर सुरुर म्हणाले की, या अंकात १७६३ ते १८00 मधील संन्यासी व फकीरांचे विद्रोह, १८२0 ते १८७0 चे वहाबी विद्रोह, १८५७ ते १९0५ चे राष्ट्रवाद उभारणीचा पर्व, १९00 ते १९३४ चे सशस्त्र संघर्ष पर्व, १९१९ ते १९४७ चे राष्ट्रीय जन संघर्ष व भारतीय मुसलमान या विषयांवर संपूर्ण सखोल माहिती व भारतातील अपूर्ण मुस्लिम स्वातंत्र्य सेनानींची यादी प्रकाशित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.









