नगरमधील धोकादायक इमारती कारवाईच्या प्रतिक्षेत अहमदनगर माणिक चौक परिसरातील इमारत रविवारी सायंकाळी कोसळल्यानंतर धोकादायक इमारतींचा ...
नगरमधील धोकादायक इमारती कारवाईच्या प्रतिक्षेत
माणिक चौक परिसरातील इमारत रविवारी सायंकाळी कोसळल्यानंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून महापालिका प्रशासनाने दोन महिन्यांपुर्वी ९८ इमारतींना नोटीसा बजावलेल्या असून त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने दोन महिन्यांपुर्वी तब्बल ९८ इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत. रविवारी माणिक चौक परिसरातील इमारत अचानक कोसळली. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नसली तरी ९८ इमारतींना बजावलेल्या नोटीसांचे पुढे काय झाले असा सवाल उपस्थित होत असून त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शहरातील सज्रेपुरा, जुना बाजार, बुरूडगल्ली, मंगलगेट, चितळे रोड, माळीवाडी, महाजन गल्ली, परदेशी गल्ली, गांधी मैदान या परिसरातील या इमारती असून हा भाग शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जातो.
प्रशासनाने बजावलेल्या नोटीसीत इमारत मालकांनी तातडीने संबंधित इमारतीचा धोकादायक भाग पाडून घ्यावा असा आदेश बजावला आहे. मात्र हे आदेश इमारत मालकांनी पाळले की नाही याबाबत कोणतीही खातरजमा प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासन इमारती कोसळण्याची वाट पहात आहे काय असा सवाल उपस्थित होत आहे.










