नगर-माथेरान दरम्यान पर्यटन व सांस्कृतिक देवाण-घेवाण; अहमदनगर; ऐतिहासिक अहमदनगर शहर व निसर्गरम्य माथेरान शहरादरम्यान आता पर्यटन व...
नगर-माथेरान दरम्यान पर्यटन व सांस्कृतिक देवाण-घेवाण;
अहमदनगर;

ऐतिहासिक अहमदनगर शहर व निसर्गरम्य माथेरान शहरादरम्यान आता पर्यटन व सांस्कृतिक देवाण-घेवाण होणार आहे. यासाठी नगर व माथेरान येथील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून, यासंदर्भात रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर यांनी पुढाकार घेतला आहे.
नगर व माथेरान शहराच्या पर्यटन व सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठी रसिक ग्रुपच्यावतीने माथेरानच्या नगराध्यक्षा वंदना शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माथेरान प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अजय सावंत, माथेरान पालिकेचे सभापती दिनेश सुतार, नगरसेवक संतोष पवार, दयानंद डोईफोडे आदी उपस्थित होते.
नगर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. शहरातील भुईकोट किल्ला, रेणुका माता मंदिर, चांदबीबी महाल, आनंदधाम, अवतार मेहेरबाबा समाधीस्थळ, फराहबक्ष महाल, रणगाडा संग्रहालय आदी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत. तर माथेरान शहराला नैसर्गिक सौदर्यांचा वारसा लाभला आहे.
माथेरानला जागतिक स्तरावर ओळख प्राप्त व्हावी म्हणून माथेरान प्रतिष्ठानतर्फे गी्रन महोत्सवाचे आयोजन केले जाते. माथेरानला नगरमधून सहली जाव्यात, तसेच माथेरानला येणार्या पर्यटकांनी नगरला भेट द्यावी यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. यासाठी येलूलकर यांनी माथेरान नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींना नगरला निमंत्रित केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, नगरचे लोकप्रतिनिधी व माथेरानचे लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे, असे येलुलकर यांनी सांगितले









