आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबाला लाभ द्या; अहमदनगर : आत्महत्या झालेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत पंचायत समिती स्त...
अहमदनगर : आत्महत्या झालेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत पंचायत समिती स्तरावरील कृषी विभागातील अधिकार्यांनी कृषी विभागाकडील जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्याचे आवाहन जि. प. कृषी पशुसंवर्धन सभापती शरद नवले यांनी केले आहे.
कृषी व पशुसंवर्धन समितीच्या मासिक सभेत नवले बोलत होते. जिल्ह्यात पारनेर तालुका वगळता अन्य तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला आहे. खरीप पिकाची स्थिती चांगली असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. रब्बी हंगामासाठी ज्वारी पिकाचे मागणीनुसार बियाणे पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन महाबीज कंपनीच्या प्रतिनिधींनी दिले.
पीक विमा योजनेला मुदत १0 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवले यांनी केले. जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची कुटुंबाची पंचायत समितीच्या अधिकार्यांनी सहानभुतीपूर्वक भेट घ्यावी. त्या कुटुंबाला प्राधान्याने कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जि. प. सेस फंडातून घेण्यात आलेल्या कृषी औजारांचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पंचायत समितीस्तरावर स्थापन करण्यात आलेला सौर ऊर्जा प्रकल्प महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सभेला पद्मा थोरात, जयश्री दरेकर, सुरेखा शेळके, मंगल निमसे, भगवान मुरमकर, रावसाहेब नवले, पूनम भिंगारदिवे, कृषी विकास अधिकारी विलास नलगे उपस्थित होते. (प्रतिनिधी) ■ पशुसंवर्धन विभागाचे डॉ. भरत राठोड यांनी जिल्ह्यात सध्या लाळखुरकत रोग प्रतिबंधक लसीकरणाचे काम सुरू आहे. याचा लाभ घेण्यासोबत पशुपालकांनी पशुधनाचा विमा उतरवण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात पशुधनाचा विमा उतरवण्यासाठी ३४८ शिबिराचे आयोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले










