जात पडताळणी समितीसाठी कार्यालयाचा शोध सुरू; जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कार्यालय ...
जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कार्यालय अभावी अध्यक्षांनी नाशिकमध्येच पदभार स्वीकारला. त्यामुळे जात प्रमाणत्रासाठी विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा, खर्च होत आहे. नगर शहरात तातडीने जात पडताळणी कार्यालय सुरू करावे, अन्यथा विद्यार्थी अधिकार परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
-डॉ. संतोष साळवे, संपर्कप्रमुख, विद्यार्थी अधिकार परिषद अहमदनगर : जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीसाठी कार्यालय शोध जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आला असून, कार्यालयासाठी महापालिकेलाही पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे जात पडताळणी समिती कार्यालय नगरमध्ये सुरू होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
सरकारने जिल्हास्तरीय जात पडताळणी समिती स्थापनेचा निर्णय घेतला आहे. मात्र समिती अस्तित्वात नव्हती. मात्र समितीच्या अध्यक्षपदी धुळे येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश वायचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर नगरमध्ये जात पडताळणी समिती कार्यालय सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, समितीसाठी नगर शहरात कार्यालय उपलब्ध नाही, असे कारण देत नाशिक येथेच अध्यक्ष वायचाळ यांनी पदभार स्वीकारला असून, नगरमध्ये कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचीही पाहणी केली. परंतु, कार्यालय उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सामान्य प्रशासनाने महापालिकेला यासंदर्भात शनिवारी पत्र दिले आहे. महापालिकेकडून जात पडताळणी समितीसाठी कार्यालयाचा शोध सुरू करण्यात आला आहे. महापालिकेची शहरात विविध ठिकाणी व्यापारी संकुल आहेत.
संकुलात जात पडताळणी समितीसाठी कार्यालय दिले जाण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून अहवाल आल्यानंतर संबंधित कार्यालयाची जिल्हा प्रशासनाकडून पाहणी करण्यात येईल. त्यानंतरच जात पडताळणी समिती कार्यालय नगरमध्ये सुरू होऊ शकते. प्रशासनाच्या या गोंधळात नागरिकांना मात्र जात पडताळणी समितीसाठी नाशिकला जावे लागत आहे. नागरिकांची जात वैधता प्रमाणपत्रासाठीची पायपीट कधी थांबणार असा प्रश्न आहे










