तरुणाईसमोर उलगडणार विवेकानंद ; अहमदनगर : स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आजच्या प्रदूषित समाजाला गरज आहे. तरुणपिढी मोबाईल व इंटरने...
अहमदनगर : स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आजच्या प्रदूषित समाजाला गरज आहे. तरुणपिढी मोबाईल व इंटरनेटच्या आभासी जगतात अडकून पडली आहे. त्यांना वास्तवाचे भान यायला हवे. म्हणून 'स्वामी विवेकानंद आणि आपण' हा विषय निवडून राज्यभरातील तरुणांपर्यंत स्वामी विवेकानंदांचे उलगडून दाखविणार आहे. याची सुरुवात बुधवार (दि.१७) पासून करण्यात येणार आहे, असे डॉ. संजय कळमकर यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी ११ वाजता येथील माउली सभागृहात 'स्वामी विवेकानंद आणि आपण' या विषयावर डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यासाठी जिज्ञासा अकादमीने पुढाकार घेतला आहे.
कळमकर पुढे म्हणाले, तरुण वर्ग हा स्वामी विवेकानंदांच्या आवडीचा विषय होता. जगातील सर्वाधिक तरुण भारतात आहेत. या तरुणांना योग्य दिशा मिळाली तर भारत महासत्ता होईल. त्यासाठी प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक अभ्यासक्रमात विवेकानंदांच्या विचारांचा समावेश केला पाहिजे. आजची तरुणपिढी ही आंतरजालाच्या आभासी जगतात अडकली आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी विवेकानंदांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. वाचनसंस्कृती कमी झाली आहे. परंतु व्याख्यानातून विवेकानंदांच्या विचारांचा चांगला प्रसार होऊ शकतो. म्हणूनच व्याख्यानासाठी हा विषय निवडल्याचे कळमकर यांनी सांगितले.
हे व्याख्यान सर्वांसाठी मोफत असल्याची माहिती जिज्ञासाचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले, जिप्सी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत नजान, शब्दगंधचे सुनील गोसावी यांनी दिली.










