जेऊर येथील अतिक्रमणाचा वाद चिघळणार जेऊर; नगर तालुक्यातील जेऊर (बा.) गावामध्ये सीनानदी पात्रात झालेल्या अतिक्रमणाचा वाद चांगलाच च...
जेऊर येथील अतिक्रमणाचा वाद चिघळणार
जेऊर;

नगर तालुक्यातील जेऊर (बा.) गावामध्ये सीनानदी पात्रात झालेल्या अतिक्रमणाचा वाद चांगलाच चिघळणार असल्याचे चित्र गावात दिसत आहे. जेऊर गावची मुख्य बाजारपेठ अतिक्रमणात असून,अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतकडून रितसर नोटिसा देण्यात आल्या होत्या; परंतु सर्व अतिक्रमणधारकांनी नोटिसांना कचर्याची टोपली दाखवत अतिक्रमण काढून घेण्यास उदासिनताच दाखवली.
विशेष म्हणजे सर्व व्यावसायिकांचे अतिक्रमण सीनानदी पात्रातच असल्याने भविष्यात येथे मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे असताना देखील प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. ग्रामपंचायतच्या अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात काही अतिक्रमणधारकांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. त्याचा निकाल दि. २५ जुलै २0१६ रोजी देण्यात आला. त्यामध्ये विभागीय आयुक्तांनी अतिक्रमण धारकांचे अपील फेटाळून लावत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३ (३ अ) प्रमाणो कारवाई करून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. आदेश मिळाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाकडून अतिक्रमण काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. परंतु ग्रामपंचायत सदस्यांमध्येच अतिक्रमणावरून आरोप -प्रत्यारोप होत आहेत. अतिक्रमण हटविण्यासाठी सर्वच ग्रामपंचायत सदस्यांची सहमती असली तरी गावामध्ये नाराजी नको म्हणून कोणीही ठाम निर्णय घेण्यास तयार नाही. गावामधील अतिक्रमणास सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा शासनाचा आदेश असला तरी ग्रामपंचायतकडून नोटिस देण्यापलीकडे कारवाई झालेली नाही. ससेवाडी ग्रामस्थांनीही त्यांच्या मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण झाल्याबाबत तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देऊनही उपयोग झालेला नाही. सीनानदी पात्रातील अतिक्रमणांबाबत महसूल खात्याने गांभीर्याने घेऊन दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिक्रमणांमुळे आठवडे बाजारासाठी ही जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराज़ीची भावना आहे.अतिक्रमणाच्या मुद्यावरून दि. १५ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा वादळी ठरणार असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले ज़ात आहे. गावातील व्यावसायिक आमची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करत आहेत. ग्रामपंचायत , महसूल विभाग व पोलिस यांच्या सहकार्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई होण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.









