सामाजिक बहिष्काराबाबत तपासाची सविस्तर माहिती द्या मुंबई - रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्काराच्या तक्रारींसंदर्भात तपासाची माहिती दाख...
सामाजिक बहिष्काराबाबत तपासाची सविस्तर माहिती द्या
मुंबई - रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्काराच्या तक्रारींसंदर्भात तपासाची माहिती दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्याने हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि अन्य काही ठिकाणी सामाजिक बहिष्काराच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर न्यायालयात फौजदारी जनहित याचिका करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी नुकतीच न्यायाधीश अभय ओक आणि ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठापुढे झाली. या तक्रारींचा तपास मुरूडऐवजी मुंबई पोलिसांकडे द्यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणांत स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासाची सविस्तर माहिती दाखल करावी, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. संबंधित तपास अधिकाऱ्यांनी पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
सामाजिक बहिष्काराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी या भागांत "मोहल्ला कमिटी‘ उपक्रम राबवण्याचे निर्देश यापूर्वीच न्यायालयाने दिले आहेत. आजच्या काळात अशा घटना होणे खेदजनक आहे; त्या रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस कारवाई करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला. याबाबत आतापर्यंत काय कारवाई केली, अशी विचारणाही खंडपीठाने केली आहे.










