महाडच्या दुर्घटनेतील २२ मृतदेह सापडले महाड : सावित्री पूल दुर्घटनेत वाहून गेलेल्या वाहनांमधील बेपत्ता प्रवाशांचा शोध सलग तिसर्या द...
|
महाडच्या दुर्घटनेतील २२ मृतदेह सापडले
महाड : सावित्री पूल दुर्घटनेत वाहून गेलेल्या वाहनांमधील बेपत्ता प्रवाशांचा शोध सलग तिसर्या दिवशी शुक्रवारी देखील युद्धपातळीवर सुरू होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत यापैकी २२ मृतदेह हाती लागले आहेत. तर, गुरुवारी एका पत्रकाराला धमकी दिल्याबद्दल गृहनिर्माणमंत्री व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
महाडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र अन्य बेपत्ता प्रवाशांचा शोध लागत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या नातेवाईकांची चिंता वाढतच चालली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या वार्ताहराला धमकी तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी प्रकाश मेहता यांच्याविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सावित्री पूल दुर्घटनेच्या ठिकाणी गुरुवारी पालकमंत्री भेट देण्यासाठी आले असता, मिलिंद तांबे या वार्ताहराने विचारलेल्या प्रश्नाला मेहता यांनी उद्धटपणे उत्तरे देत अर्वाच्च भाषा वापरली. (वार्ताहर) प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी 'त्या' प्रकाराबाबत ट्विटरद्वारे दिलगिरी व्यक्त केली. पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मेहता यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्यालाही खेद वाटतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
|










