शिक्षक भारतीचा मंत्रालयावर विराट बॅटरी मोर्चा; अहमदनगर : राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर शिक्षक भारतीच्या संघटनेच्या...
शिक्षक भारतीचा मंत्रालयावर विराट बॅटरी मोर्चा;
अहमदनगर : राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर शिक्षक भारतीच्या संघटनेच्या वतीने मंत्रालयावर सोमवारी विराट बॅटरी मोर्चा काढण्यात आला. रात्र शाळांना मुक्त शाळेचा पर्याय देण्याची योजना शिक्षण विभागाने जाहीर केली होती. सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील रात्रशाळांचा प्रश्न गंभीर बनला असून या शाळा बंद करण्याचा डाव शिक्षक भारती संघटनेच्यावतीने हाणून पाडण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती संघटनेचे सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
दिवसांच्या शाळांच्या संच मान्यतेचे निकष रात्रशाळा आणि रात्र उच्च माध्यमिक शाळांना लावल्यामुळे मोठय़ा संख्येने शिक्षक अतिरिक्त झाले. महत्वाच्या विषयांना शिक्षकच उरलेले नाहीत. परंतु आताचे नवे सरकार नाईट स्कूल, नाईट कॉलेज बंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. व ओपन स्कूल सुरू करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी नाईट स्कूल व नाईट कॉलेज शिक्षक, विद्यार्थी यांचा विराट बॅटरी मोर्चा रात्रीच्या वेळी मंत्रालयावर नेण्यात आला.
यापूर्वी अनुदानीत आश्रमशाळेतील अतिरिक्त झालेल्या कर्मचार्यांचे तसेच अल्पसंख्याक संस्थेमधील उच्च माध्यमिक विद्यालयात काम करणार्या शिक्षकांचे वेतनही काम नाही वेतन नाही या धोरणानुसार जुलैमध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार वेतन थांबवण्यात आले आहेत. राज्यात अनुदानीत ५५६ आश्रमशाळा असून त्यावर १६ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. राज्यभर आश्रम शाळेवर अतिरिक्त झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा, माध्यमिक शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर तात्काळ समायोजन करून त्यांचे पगार पूर्ववत सुरू करावे. विद्यार्थी संख्येची अट शिथिल करून प्रत्येक वर्गात २0 एवढी संख्या असावी, यासाठी कायद्यात दुरूस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक अेलसरे, राज्य सचिव गाडगे, कार्याध्यक्ष अप्पासाहेब जगताप यांनी केले. मोर्चात जितेंद्र आरू, बाबासाहेब लोंढे, हनुमंत रायकर, निवेदिता धायबर, बेबीनंदा लांडे, जान्हवी नरसाळे, जया गागरे, छाया लष्करे, सुधीर शेडगे सहभागी होते.










