महापालिकेचा कारभार गतिमान करा : छिंदम नागरीकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी जुन्या महापालिकेत आपले कार्य...
महापालिकेचा कारभार गतिमान करा : छिंदम
नागरीकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी जुन्या महापालिकेत आपले कार्यालय सुरु केलेले आहे. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्तिक बैठक घेऊन ताबडतोब नागरी समस्या सोडविण्याचे आदेश दिलेले आहेत. यावेळी प्रभाग अधिकारी एम. एम. वैद्य, मार्केट विभाग प्रमुख सुनिल तांबोळी, स्वच्छता निरिक्षक देशमुख व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कर्मचार्यांनी वेळेवर उपस्थित राहुन गतीमान प्रशासकीय कारभार करण्याच्या सूचना छिंदम यांनी दिल्या. त्यामुळे नागरीकांच्या नागरी समस्या तात्काळ सुटण्यास मदत होणार आहे. या कार्यालयात विविध परिसरातील नागरीक आपल्या विविध नागरी समस्या घेऊन आले होते. त्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले.
उपमहापौर कार्यालय हे नगर-औरंगाबाद रोडवरील नविन प्रशासकीय इमारत येथे आहे. या कार्यालयात सावेडी उपनगरातील नागरीक आपल्या नागरी समस्या घेऊन येत असतात, त्यांना हे कार्यालय सोयीस्कर आहे. परंतु शहरातील नागरीकांना त्यांच्या नागरी समस्या मांडण्याकरीता नविन प्रशासकीय इमारतीत यावे लागते. हे कार्यालय शहरापासून दूर अंतरावर असल्याने त्यांचा बहुमुल्य वेळ वाया जाऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तसेच येण्या जाण्याकरीता नागरीकांना वेळेवर वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे नागरीकांना या कार्यालयात येण्यास अडचणी येत होत्या. याकरीता उपमहापौर कार्यालय जुने मनपा कार्यालय येथे गुरुवार दि. १८ पासून सुरु केल्याने नागरीकांना आपल्या नागरी समस्या मांडण्यास त्याचप्रमाणे समस्यांचे निराकरण करण्यास सोयीचे होणार असल्याचे श्री. छिंदम म्हणाले. छिंदम या कार्यालयात दररोज सकाळी १0.३0 ते दुपारी १२ वाजेपर्यंत नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.










