शेवगाव पोलीस ठाण्यात तणाव; अपघाती मृत्यू झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी शेवगा...
शेवगाव पोलीस ठाण्यात तणाव;

अपघाती मृत्यू झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी शेवगाव पोलीस ठाण्यात मृतदेह आणून पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त केला. शेवगाव : दुचाकीस्वारांच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने मृताच्या संतापलेल्या नातेवाईकांनी मृतदेह रूग्णवाहिकेसह थेट पोलीस ठाण्यात आणला. मृताच्या नातेवाईकांच्या संतापामुळे शेवगाव पोलीस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विकास नामदेव घुले (वय २२, रा. तळणी, ता. शेवगाव) या दुचाकीस्वाराचा शेवगाव-पैठण राज्यमार्गावर तळणी येथे भरधाव वेगाने येणार्या मोटारसायकलस्वारांनी धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. नगरला हलविल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ चालविल्याने मयताच्या संतप्त नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून संताप व्यक्त केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर मृतावर तळणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेवगावचे दोन शाळकरी मुले त्यांच्या मैत्रिणींसमवेत दोन दुचाकीवरून भरधाव वेगात शेवगावकडे येत होते. तळणी येथे दुचाकीवरून शेताकडे निघालेल्या विकास घुले या तरुणास त्यांची जोरदार धडक बसली.यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास नगरला औषधोपचारासाठी हलविण्यात आले. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे गुरूवारी निधन झाले. याबाबत भगवान बाबासाहेब घुले यांच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुरूवारी दोन शाळकरी मुलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस नाईक बाबासाहेब शेळके तपास करीत आहेत.









