इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मारहाण; अहमदनगर : शहरातील इंग्रजी माध्यमातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिस्तीच्या नावाखाल...
अहमदनगर : शहरातील इंग्रजी माध्यमातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांना होणारी मारहाण अमानूष असून पालकांनी शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानंतरही या घटना वाढत आहेत.
शहरात मराठी माध्यमाच्या शाळांसोबत इंग्रजी माध्यमातील शाळांचे पेव फुलले आहे. या शाळांना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक विभागाकडून मान्यता देण्यात येत आहे. या सर्व शाळांना बालकांचा मोफत शिक्षणाचा कायदा (आरटीई) लागू आहे. या कायद्यात कलम १७ मध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणे सोडाच, त्यांना घालून-पाडून बोलण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. असे असतांना शहरातील इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिस्तीच्या नावाखाली अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
गेल्या आठवड्यात शहरातील एका ऑर्थाेपेडीक डॉक्टरांच्या ५ वीच्या वर्गात शिक्षण घेणार्या मुलीच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या विद्यार्थिनीला शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेत अंगावर काळे-निळे वळ उठेपर्यंत मारहाण केली. त्यावर संबंधित डॉक्टर शाळेत याबाबत विचारणा करण्यास गेले असता, मुख्याध्यापिकेने सरळ हातात शाळा सोडल्याचा दाखला देण्याचा इशारा दिला. त्यावर संबंधित डॉक्टरांनी विद्यार्थी मस्ती करणारच, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मात्र, शिक्षेचे स्वरूप निश्चित असावे. विद्यार्थ्यांच्या अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण होवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या शाळे संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे या पूर्वी अशा स्वरूपाच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यांची एकत्रित चौकशी करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
आरटीई कायद्यानुसार मारहाण सोडता विद्यार्थ्यांची मानहानी होईल, असे घालून पाडून बोलणे सुध्दा या कायद्यानुसार बोलता येत नाही. असा कोणता प्रकार शहरातील आणि जिल्ह्यातील शाळेत घडल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. संबंधित पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी.
-लक्ष्मण पोले,










