ग्रामसेवकांच्या प्रश्नाबाबत प्रशासन सकारात्मक ; पारनेर तालुक्यातील जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या त्रैमासिक सभेत जि.प. ग्रामपंचा...
ग्रामसेवकांच्या प्रश्नाबाबत प्रशासन सकारात्मक ;

पारनेर तालुक्यातील जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या त्रैमासिक सभेत जि.प. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या हस्ते युनियनच्या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. अहमदनगर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामसेवक हा महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्रशासन नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असते. जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या कालबध्द पदोन्नती, ग्रेड पेचा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे. कर्मचार्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका प्रशासनाची असून जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे काम उत्तम आहे. मात्र, काळाची पावले ओळखून ग्रामसेवकांनी आपल्या कामकाजात संगणक प्रणालीचा वापर वाढवावा, असे आवाहन जि.प. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी केले.
पारनेर तालुक्यातील जिल्हा ग्रामसेवक युनियनची त्रिमासिक सभा, डीसीपीएस धारक मेळावा युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ढाकणे बोलत होते. यावेळी युनियनचे कोषाध्यक्ष बापूसाहेब अहिरे, अमोल घोळवे, बाळासाहेब गावडे, श्रीकांत वाव्हळ, बाळासाहेब कडू, गुरूमाउली शिक्षक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, सरपंच मिराताई नरसाळे, शहाजी नरसाळे आदी उपस्थित होते.
यावेळी शिर्के यांच्या हस्ते ग्रामसेवक युनियनच्या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा ग्रामसेवक युनियनची नूतन कार्यकारिणी ढाकणे यांच्या हस्ते अविरोध करण्यात आली. शिर्के म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून ढाकणे यांनी सातत्याने ग्रामसेवकांच्या मागण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक संघटना योग्य दिशेने वाटचाल करत आहे.
विविध कारणामुळे निलंबित असणार्या ग्रामसेवकांना पुन्हा सेवेत घेण्यात येत आहे. येत्या काळात जिल्ह्यात पंचायत राज समिती भेट देणार आहे. त्या दृष्टीने तयारी करावी लागणार आहे. ग्रामसेवकांनी ई गव्हर्नन्सचा वापर वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
ढाकणे यांनी ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेले ग्रामसेवक अतिशय तन्मयतेने सेवा बजावत असतात. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत ग्रामसेवकांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात उत्तम काम करून टंचाई काळात ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम केले आहे. प्रशासकीय निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केली. ग्रामसेवक त्यांचे कर्तव्य चोख बजावत असल्याने प्रशासनाने त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे, डीसीपीएस धारकाच्या पेन्शनच्या प्रश्नांसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कर्मचार्यांच्या विविध संघटनांनी पुकारलेल्या २ सप्टेंबरच्या संपात सर्व ग्रामसेवक सहभागी होणार आहेत.
स्वागत नरसाळे, सूत्रसंचालन तिलोत्तम रोकडे यांनी केले. मेळाव्यास अशोक नरसाळे, मधुकर दहिफळे, बाळासाहेब गागरे, युवराज ढेरे, रमेश बांगर, मंगेश पुंड, बाळासाहेब आंबरे, सुनील नागरे आदी उपस्थित होते









