अमृत योजनेकडून अपेक्षा; अहमदनगर : 'देणार्याचे हात हजारो.. दुबळी माझी झोळी..' अशीच अवस्था महापालिकेच्या पाणी योजनेची झाली आह...
अहमदनगर : 'देणार्याचे हात हजारो.. दुबळी माझी झोळी..' अशीच अवस्था महापालिकेच्या पाणी योजनेची झाली आहे. मुसळधार पावसाने मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांनी याही धरणातून अतिरिक्त पाणी सोडले जाईल. धरण भरणार असल्याने नगरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. दिवसाआड असलेला पाणीपुरवठा रोज होईल, अशी नगरकरांची अपेक्षा मात्र फोल ठरणार आहे. कारण पाणी उपसा करण्याची आणि ते साठविण्याची अतिरिक्त क्षमताच महापालिकेकडे नसल्याने पाणी भरपूर असले तरी ते नगरकरांना दिवसाआड मिळणार आहे.
यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. १५ ऑगस्टच्या आतच जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. नगर शहराला पाणी पुरवठा करणार्या मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक झाली आहे. आज अखेरीस ८५ टक्क्यांच्यावर धरण भरले आहे. काही तासांमध्येच ते शंभर टक्के होईल. मुळा धरण भरणार असल्याने शहराला पाणी पुरवठा मुबलक होणार असल्याने नगरकरांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आजही अनेक भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. सारसनगर, शिवाजीनगर,बोल्हेगाव, नवनागापूर आदी भागांमध्ये एक-दोन दिवसाआड तसेच आजही टँकरने पाणी पुरवठा होत आहे. शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. आता मुळा धरणातील पाणी वाढल्याने ते शहराला रोज दिले जावे,तसेच ज्या भागात पुरेसे पाणी येत नाही, त्या भागात पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र ती फोल ठरली आहे.
मुळा धरणात पाणी कमी होते म्हणून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात नव्हता. तर पाणी उपसणे आणि ते पाणी साठविण्याच्या क्षमतेला र्मयादा आहेत. रोज पाणी द्यायचे असेल तर ९५ दशलक्ष घनमीटर पाणी उपसा करावा लागणार आहे. मात्र तेवढा उपसा करण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. सध्या ७३ दशलक्ष घनमीटर पाणी उपसा केला जातो. त्यापेक्षा जास्त पाण्याचा उपसा करण्याची मनपाची क्षमता नाही. पाणी उपसा झाला तरी पाणी साठविण्याची क्षमता नाही, असे महापालिका आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.
पाण्याचा उपसा जास्तीने झाला तरी जलशुद्धीकरण प्रकल्प दुसरा उभा करावा लागणार आहे. तसेच पाणी साठवण टाक्या कार्यान्वित कराव्या लागणार आहेत. सुधारित पाणी पुरवठा योजनेतील टाक्यांची, जलवाहिन्या अंथरण्याची अनेक कामे रखडली आहेत. फेज टू योजनेचा बोजवारा उडाला आहे. अशा स्थितीत जास्तीचा पाणी उपसा होण्याची शक्यता कमीच आहे. (प्रतिनिधी) ■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराचा विकास करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अमृत योजनेची घोषणा केली होती. त्याअंतर्गत नगर शहराला १७८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. अंतिम योजनेचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर या योजनेसाठी नगर शहराला १३४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याअंतर्गत मुळा धरण ते विळद आणि विळद ते वसंत टेकडी अशी पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी संपूर्णपणे बदलण्यात येणार आहे. साठवण टाक्या तयार करणे, आणखी एक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणी आणि योजनेचे नूतनीकरण करणे अशी या योजनेतून कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय पिंपळगाव माळवी येथे सौरऊर्जा प्रकल्प साकारणार आहे. अमृत योजनेद्वारा पाणी योजनेची क्षमता वाढणार आहे. त्यानंतरच शहराला रोज पाणी पुरवठा करणे शक्य होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.










