पाऊले चालली निखार्याची वाट; हनुमान महाराज की जय, अशा पारंपारीक घोषणासह दिवंगत प.पु. माधवस्वामी यांचा नाम जयजयकार करीत राज्याच्या ...
पाऊले चालली निखार्याची वाट;

हनुमान महाराज की जय, अशा पारंपारीक घोषणासह दिवंगत प.पु. माधवस्वामी यांचा नाम जयजयकार करीत राज्याच्या काना कोपर्यातून आलेल्या हजारो आबाल वृध्द भाविकांनी (आज १ ऑगस्ट रोजी) रखरखत्या लालबुंद निखार्यावरून अनवाणी चालत जावून पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे नवसाचा संकल्प व पूर्तीची पर्वणी साधली.
सुमोर पाच हजार भाविक निखार्यावर चालल्याचा अंदाज देवस्थान समितीकडून व्यक्त होत आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षित युवक, युवती व महिलांची संख्या लक्षणीय असल्याने नवसपूर्तीसाठी रांगा लागल्या होत्या. आळंदी येथील साधक नंदुकाका बंदीष्टे व दहिवडी (जि. सातारा) येथील तहसीलदार डॉ. भक्ती देवकाते या मान्यवरांच्या हस्ते आणि देवस्थानचे अध्यक्ष रमेश आप्पा महाराज यांच्या उपस्थितीत दुपारी ३,३0 वा. रहाडाची अग्निपूजा झाली. सुमारे दोन तासानंतर विस्तव (निखारे) तयार झाल्यानंतर ५.३0 वा. मानकरी बाबासाहेब लोखंडे (धामणगाव, ता. आष्टी) या युवकाने पहिल्यांदा अग्निकुंडाला श्रीफळ वाढवत निखार्यांची वाट चालली. यावेळी सर्मथ हनुमानाच्या जय घोषणाने परिसर दुमदुमला. त्यानंतर रहाडास सुरुवात झाली.
रात्री उशिरापर्यंत भाविक त्यावरुन जात होते.यावर्षी देवस्थान समितीने रहाडा भोवती लोखंडी पाईपची दर्शनी बारी केल्याने गर्दी असूनही शिस्त राहिली. हनुमान मंदिर जीर्णाेध्दारासाठी दिवसभर देणग्यांचा ओघ सुरू होता. गावातील शेकडो तरुण स्वयंसेवकांच्या सहभागाने यात्रा शांततेत पार पडली. सकाळी महाआरती व महाभिषेक तर रात्री प्रार्थना भजन हरिपाठ असे धार्मिक विधी झाले.









