कलाशिक्षकांना अतिरिक्त न ठरविण्याची मागणी; अहमदनगर : जिल्ह्यातील काही शाळांत कलाशिक्षकांना जाणीवपूर्वक अतिरिक्त ठरविण्याचा घाट घातला...
|
कलाशिक्षकांना अतिरिक्त न ठरविण्याची मागणी; अहमदनगर : जिल्ह्यातील काही शाळांत कलाशिक्षकांना जाणीवपूर्वक अतिरिक्त ठरविण्याचा घाट घातला जात असून, कला शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात येऊ नये,अशी मागणी कला संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हा परिषदेचे उप शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. जिल्ह्यात सध्या अतिरिक्त शिक्षकांना प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र बहुतांश शाळेत कलाशिक्षकांनाच अतिरिक्त ठरविण्यात येत असल्याच्या तक्रारींवरून कला शिक्षक संघाचे अध्यक्ष अशोक डोळसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी दिलीप थोरे यांची भेट घेवून निवेदन दिले. शिष्टमंडळात संजय पठाडे,रवींद्र गायकवाड आदींचा समावेश होता. यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की कलाशिक्षकांना प्रथम कला विषयाच्या सर्व तासिका देण्यात याव्यात. त्यानंतर कमी असलेला कार्यभार कार्यानुभव आणि इतर विषयांचा कारभार देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. असे असले तरी अनेक शाळांमधून कार्यभार वितरीत करताना कला विषयाच्या तासिका इतर विषय शिक्षकांना व प्रशिक्षित कलाशिक्षकांना इतर विषयांच्या तासिका देण्यात येत असल्याचे यावेळी संघाच्या पदाधिकार्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यावर प्रत्येक शाळेत कला शिक्षकाची आवश्यकता असून, यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. कला शिक्षकांना संपूर्ण सेवा संरक्षण आहे. बहुतांश शाळांमधून केवळ एकच कला शिक्षक कार्यरत आहे. त्यांना अतिरिक्त ठरवू नये, अशी मागणी करण्यात आली. |










